Lok Sabha Election 2019; विदर्भात हवा फिफ्टी-फिफ्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:01 AM2019-04-08T11:01:00+5:302019-04-08T11:07:03+5:30

विदर्भातील राजकीय वातावरणाचा ग्राऊंड रिपोर्ट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विदर्भाची हवा फिफ्टी-फिफ्टीचे संकेत देत आहे.

Lok Sabha Election 2019; Vidharbha air Fifty-Fifty! | Lok Sabha Election 2019; विदर्भात हवा फिफ्टी-फिफ्टी!

Lok Sabha Election 2019; विदर्भात हवा फिफ्टी-फिफ्टी!

googlenewsNext
ठळक मुद्देआघाडीच्या मतांची बेरीज भाजप-शिवसेना युती वजाबाकी कशी रोखणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भातील लोकसभेच्या १०पैकी १० जागा जिंकून भाजप-सेना युती २०१४ साली मोदी लाटेवर स्वार झाली होती. नितीन गडकरींसारखा तगडी प्रतिमा असलेला राष्ट्रीय नेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गतिमानता, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मंत्र्यांचा ताफा आणि रेशीमबागेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गावोगावी कार्यरत यंत्रणा हे भाजप-सेनेचे विदर्भातील बलस्थान आणि त्याला पूरक ठरणाऱ्या नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्या सभा असल्या तरी २०१४ ची हवा आता राहिलेली नाही. त्यामुळेच विदर्भातील राजकीय वातावरणाचा ग्राऊंड रिपोर्ट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विदर्भाची हवा फिफ्टी-फिफ्टीचे संकेत देत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरा पर्याय म्हणून उभे राहण्याचा चालविलेला प्रयत्न तसेच बहुजन महासंघाने लावलेली शक्ती नक्की कोणता परिणाम करणार हेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात विकासकामे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा सरळ माणूस या प्रतिमेचा नितीन गडकरी, यांना चांगला फायदा होताना दिसतो. थेट मोदींच्या विरोधात संघर्ष करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांची मदार त्यांची आक्रमक प्रतिमा व काँग्रेसमधील विविध गटांच्या कामगिरीवर आहे. या मतदारसंघात सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी पावणेतीन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. यावेळी ते किती मते घेणार, हाच खरा प्रश्न आहे.

रामटेक : जातीय धु्रवीकरणावर मदार
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या खा. कृपाल तुमाने यांच्यापुढे काँग्रेसच्या किशोर गजभिये या नवख्या उमेदवाराचे आव्हान आहे. शिवसेनेची प्रचार यंत्रणा गतिमान होत असताना काँग्रेसची यंत्रणा मात्र येथे सायलेंट मोडवर असल्याचे दिसून आले. ती गतिमान करणे हे उमेदवार आणि काँग्रेस पक्ष संघटनेपुढे मोठे आव्हान आहे. २०१४ च्या निवडणुकीत खा. तुमाने पावणेदोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी कुणबी, तेली, कोष्टी, मुस्लीम, मराठा मतांचा टक्का कुणाच्या बाजूने वाढतो, यावरच या मतदारसंघाचे भवितव्य आहे.

वर्धा : मेघेंच्या भूमिकेकडे लक्ष
वर्धा लोकसभा मतदारसंघातूनच महाराष्ट्रातील आपल्या सभांची मुहूर्तमेढ नरेंद्र मोदी यांनी रोवली होती. विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारु लता टोकस तसेच बहुजन समाज पार्टीचे शैलेश अग्रवाल यांच्यात लढत होत आहे. जातीय समीकरणात तेली, मराठा, दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन कसे होते, यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. या मतदार संघात भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. कुणबी, तेली, सावजी समाज अधिक कुणाला जवळ करणार, यावरच निवडणुकीचा निकाल ठरेल. भाजप गोटातील माजी खासदार दत्ता मेघे यांचीही भूमिका निवडणुकीत रंग भरणारी ठरू शकते.

चंद्रपूर-आर्णी: काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपचे मंत्री हंसराज अहीर आणि शिवसेनेचे काँग्रेसमध्ये दाखल झालेले बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस उमेदवारीवरून उडालेला गोंधळ आणि पक्षांतर्गत गटबाजी थोपविणे अशा समस्यांना धानोरकरांना तोंड द्यावे लागेल. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदार संघात कुणबी आणि तैलिक समाजाचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

अकोला : मतविभागणी कुणाच्या पथ्यावर
अकोला मतदार संघात भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यात काट्याची लढत होत आहे. या मतदार संघात अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध, मातंग या मतांबरोबरच मुस्लीम बंजारा, धनगर, माळी, मराठा मते कुणाच्या बाजूने कौल देणार, यावरच या मतदार संघातील पहिल्या क्रमांकावर कोण उमेदवार जाणार, हे ठरेल.

यवतमाळ-वाशीम : शिवसेनेत बंडाळी
हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक व स्व. सुधाकरराव नाईक या माजी मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीतील यवतमाळ- वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार ठरणार आहे. भाजप बंडखोर उमेदवार बी. पी. आडे यांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर बरीच गणिते बेतली आहेत. चारवेळा खासदार राहिलेल्या गवळी यांच्यापुढे माणिकराव ठाकरे यांनी कडवे आव्हान उभे केल्याचे दिसते. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भंडारा-गोंदिया : इथेही जातीय तिढा
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावर माजी मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव आहे. याच मतदार संघातून नाना पटोले यांनी २०१४ साली पटेल यांचा पराभव केला होता. आता पटोले काँग्रेसवासी आहेत तर यावेळी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे आणि भंडाऱ्याचे नगराध्यक्ष भाजपचे सुनील मेंढे यांच्यात ही लढत होत आहे. बेरोजगारी, शेती आणि मत्स्य व्यवसाय यासारखे प्रश्न या मतदारसंघात आहेत. तर पोवार, कुणबी, नवबौद्ध, माळी, तेली, लोधी, मराठा आदी समाजांच्या मतांचे विभाजन कुणाच्या बाजूने जाते, यावरच या मतदार संघाचा निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

गडचिरोली-चिमूर: अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी फॅक्टर
गडचिरोली-चिमूर या मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेवराव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेश गजबे यांच्यात लढत होत आहे.
आदिवासीबहुल असलेल्या या मतदार संघात जंगल अधिकार कायदा, तेंदूपत्त्याचा लिलाव यासारख्या जिव्हाळ्याच्या मुद्यांची चर्चा होते. विद्यमान खासदार अशोक नेते यांची ही दुसरी टर्म आहे.

अशा आहेत विदर्भातील प्रमुख लढती
नागपूर 
नितीन गडकरी भाजप
नाना पटोले काँग्रेस

रामटेक
कृपाल तुमाने शिवसेना
किशोर गजभिये काँग्रेस

यवतमाळ
भावना गवळी- शिवसेना
माणिकराव ठाकरे- काँग्रेस
पी.बी. आडे - अपक्ष, भाजप बंडखोर

वर्धा
रामदास तडस भाजप
अ‍ॅड. चारूलता टोकस, काँग्रेस

चंद्रपूर
हंसराज अहीर भाजप
सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, काँग्रेस

गडचिरोली
अशोक नेते भाजप
डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस

भंडारा- गोंदिया
नाना पंचबुद्धे
राष्ट्रवादी काँग्रेस
सुनील मेंढे
भाजप

अमरावती
आनंदराव अडसूळ- शिवसेना
नवनीत राणा- अपक्ष (राष्ट्रवादी समर्थित)
गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी)

अकोला
अ‍ॅड. संजय धोत्रे, भाजप
हिदायत पटेल, काँग्रेस
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी

बुलडाणा
डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रतापराव जाधव, शिवसेना
बळीराम सिरस्कार
वंचित बहुजन आघाडी

Web Title: Lok Sabha Election 2019; Vidharbha air Fifty-Fifty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.