Lok Sabha Election 2019; वॉररूममधून; निवडणुकीचे शिस्तबद्ध संचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:53 AM2019-04-02T10:53:40+5:302019-04-02T10:56:55+5:30

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी उभारलेल्या मुख्यालयातून सर्व कामकाजाचे शिस्तबद्ध संचालन सुरू आहे.

Lok Sabha Election 2019; From the war room; The disciplined operation of the elections | Lok Sabha Election 2019; वॉररूममधून; निवडणुकीचे शिस्तबद्ध संचालन

Lok Sabha Election 2019; वॉररूममधून; निवडणुकीचे शिस्तबद्ध संचालन

Next
ठळक मुद्देउमेदवाराच्या दिनक्रमापासून नेत्यांच्या सभा बैठकीचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी उभारलेल्या मुख्यालयातून सर्व कामकाजाचे शिस्तबद्ध संचालन सुरू आहे. प्रशासकीय घडामोडीपासून, पक्षाच्या नेत्यांचे आगमन, त्यांच्या सभा, बैठका, उमेदवाराच्या दिनक्रमाचे नियोजन या कार्यालयातून होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी, कामकाजासाठी उत्सुक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यालयात रेलचेल दिसून येत आहे.
मॉडेल मिल चौकात भाजपाने निवडणुकीसाठी प्रचाराचे मुख्यालय बनविले आहे. त्याचबरोबर प्रत्येक विधानसभानिहायसुद्धा पक्षाने कार्यालयाची निर्मिती केली आहे. या सहाही कार्यालयावर मुख्यालयाचे नियंत्रण आहे. मुख्यालयात संगणक, कूलर, टीव्ही, शेकडो खुर्च्या, कार्यालय प्रमुख आणि समन्वयकाचा कक्ष यांच्यासह वॉर रूम, कॉल सेंटर, मतदार यादी शोध कक्ष आदींची निर्मिती केली आहे. कार्यालयापुढे भव्य होर्डिंग, आतमध्ये पक्षप्रमुखांची फोटो, उमेदवाराच्या प्रचाराचे होर्डिंग, विकास कामांची माहिती देणारे बॅनर अख्खे कार्यालय भाजपामय झालेले आहे. निवडणूक प्रचार प्रमुखाची जबाबदारी आमदार सुधाकर देशमुख यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात प्रचार यात्रा, उमेदवाराचा दौरा, सभा, बैठकांचे नियोजन होत आहे. निवडणुकीत प्रचारासाठी फिरणाऱ्या गाड्या, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे. वॉर रूमच्या माध्यमातून मीडिया, सोशल मीडियावरील प्रचार, मतदारांना आवाहन करण्यासाठी पाठविले जाणारे संदेश, आदीचे नियोजन करण्यात येत आहे. याची जबाबदारी आयटी सेलचे प्रमुख केतन मोहितकर यांच्याकडे आहे.

दररोज घेतला जातो आढावा
विधानसभानिहाय बैठका, सभा, प्रचाराचे नियोजन केले आहे. प्रत्येकाला विशिष्ट जबाबदारी दिली आहे. त्यासाठी निवडणूक प्रतिनिधी व टीम तयार करण्यात आली आहे. रोज रात्री निवडणूक प्रमुख आमदार सुधाकर देशमुख यांच्याकडून दिवसभराच्या सर्व कामकाजांचा आढावा घेतला जातो.

मतदान शोध केंद्र
पक्षाच्या मुख्यालयात मतदान शोध केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागपूर लोकसभेत कुठल्याही मतदाराला आपले मतदान कुठल्या केंद्रात आहे, याची माहिती येथून मिळते. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे मतदान शोध केंद्र वाढविण्यात येणार असल्याचे कार्यालय प्रमुखांनी सांगितले.

यांच्यावर आहे कार्यालयाची धुरा
विनायक डेहनकर, कार्यालय प्रमुख, किशोर पलांदूरकर कार्यालय समन्वयक, किशोर पाटील साहित्य प्रमुख, केतन मोहितकर कॉल सेंटर प्रमुख.

Web Title: Lok Sabha Election 2019; From the war room; The disciplined operation of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.