Lok Sabha Election 2019; नागपूरलगतच्या जिल्हा सीमांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:02 PM2019-04-01T12:02:19+5:302019-04-01T12:03:30+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. आता जिल्ह्यांतर्गत सीमाही सील करण्यात आल्या असून यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्याला लागून मध्यप्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्यप्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील मतदार इकडे येता कामा नये, यासाठी सीमेवर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येत आहे. कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या संदर्भात दोन्ही जिल्ह्यातील पोलीस आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा आहे. आता याच धर्तीवर जिल्हास्तरीय सीमासुद्धा सील करण्यात आल्या आहेत.
नागपुरात आठ नाके आहेत. यामध्ये वाडी, हिंगणा, काटोल, दिघोरी, खापरी, कामठी, कोराडी आणि पारडी नाक्याचा समावेश आहे. आठही नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या काळात अवैधपणे दारू, पैसा आदी मोठ्या प्रमाणावर येत असतात. ते रोखण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे. एकूणच जिल्हा सीमेवरील नाक्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
नाक्यानंतरही नाकेबंदी
नागपूर जिल्ह्यातील नाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहेच. परंतु नाक्यापासून थोड्या दूर अंतरावर शहरामध्ये पुन्हा नाकेबंदी करण्यात येत आहे. जेणेकरून एखादे वाहन नजर चुकवून नाक्यावरून निसटले तरी नाकेबंदीमध्ये ते सापडले जातील, असा याचा उद्देश आहे.