Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:28 AM2019-03-12T10:28:38+5:302019-03-12T10:30:50+5:30

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2019; Who will fight in Katol of Nagpur district? | Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार?

Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार?

Next
ठळक मुद्देभाजप-सेनेने दंड थोपटलेकाँग्रेसला राष्ट्रवादीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी युती आणि आघाडी नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप, सेनेने ही निवडणूक स्वतंत्र लढविली होती. मात्र आता युती आणि आघाडी झाल्याने या जागेवर कोण लढणार यासाठी राजकीय मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे. युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर विजय मिळविल्याने ही जागा भाजपने लढवावी असा काटोल मतदारसंघातील भाजप नेत्यांचा आग्रह आहे. भाजपकडून येथे विधानसभा प्रभारी अविनाश ठाकरे, काटोल नगर परिषदेचे सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकूर आणि काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी बाशिंग बांधले आहे. इकडे हा मतदारसंघ युतीत सेनेच्या वाट्याला येत असल्याने शिवसनेने काटोलसाठी कंबर कसली आहे. गतवेळी येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे यांनी निवडणूक लढविली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मतदारसंघात आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादीकडून जिल्हा काँग्रेसला काटोलसाठी प्रस्ताव आल्यास यावर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका जिल्हा काँग्रेसने व्यक्त केली आहे. २०१४ मध्ये येथे राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांनी तर काँग्रेसकडून दिनेश ठाकरे यांनी निवडणूक लढविली होती. यात दोघांनाही मतविभाजनाचा फटका बसला होता. २०१४ मध्ये येथे २१ उमेदवार रिंगणात होते.

२०१४ मध्ये काटोलमध्ये भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे पोटनिवडणूकही भाजपच लढविणार आहे. काटोल मतदारसंघातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १९ ते २० मार्चला बैठक बोलविली आहे. यासोबत पक्षाकडून येथे सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र काटोलची जागा भाजप लढवेल हे निश्चित.
- डॉ.राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप

भाजप-सेनेची राज्यात युती झाली आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येते. काटोलसाठी सेनेचे दावा आहे. यासंदर्भात मंगळवारी मातोश्रीवर बैठक आहे.
- राजेंद्र हरणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

काटोलबाबत जिल्हा राष्ट्रवादीकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. काटोलसाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा होईल. काटोलच्या स्थानिक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांनी मते जाणून घेतली जातील. या बैठकीचा निर्णय प्रदेश काँग्रेसला कळविला जाईल.
- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी.

आघाडीत काटोलची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. काटोलची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.
- अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Lok Sabha Election 2019; Who will fight in Katol of Nagpur district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.