Lok Sabha Election 2019; सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:40 AM2019-04-06T10:40:08+5:302019-04-06T10:42:13+5:30
सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.
मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा रणसंग्राम सुरू झाला आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभेच्या फैरी झडत आहेत. पण या सभा खऱ्या अर्थाने गाजत आहेत, त्या गर्दीवरून. कुणाच्या सभेत किती खुर्च्या खाली, कुणाच्या सभेत किती गर्दी झाली यावर कार्यकर्त्यांच्या फुशारक्या मारणे सुरू आहे. सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.
नुकतीच वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरदुपारी झाली. सभेचे मैदान रिकामे असल्याचे फोटो व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. रिकाम्या खुर्च्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोदी लाट ओसरल्याचा आव आणू लागले. दुसऱ्याच दिवशी भंडारा गोंदिया मतदारसंघात मोदींच्या झालेल्या सभेत भरभरून गर्दी झाली आणि सोशल मीडियावर परत भाजपा कार्यकर्त्यांनी ‘अबकी बार फीर मोदी सरकार...’ अशी बतावणी सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात सभा घेतली. संघाच्या भूमीत राहुल गांधीच्या सभेवर विशेष लक्ष लागले होते. नाही-नाही म्हणता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त गर्दी जमवली. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यातही रिकाम्या खुर्च्या शोधल्या. गडकरींच्या विधानसभानिहाय होत असलेल्या सभाही गाजत असल्या तरी काँग्रेस कार्यकर्ते त्यातूनही रिकाम्या खुर्च्या शोधून सोशल मीडियावर गडकरी संकटात असे भासवित आहेत.
सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या या फुशारक्या अॅन्टी प्रचाराचे एक माध्यम झाले आहे. भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळवून आपले नेते किती भारी याचा देखावा करीत आहेत.
मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाही
टीव्ही आणि सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे राष्ट्रीय नेत्यांचा क्रेझ जनतेमध्ये राहिला नाही. नेत्यांच्या प्रचार सभेत झालेली गर्दी अथवा राहिलेल्या रिकाम्या खुर्च्या याचा मतदानाशी काही संबंध नाही. शहरी आणि जागरुक मतदार सभेच्या भानगडीत पडतच नाही. गर्दी जमविणे ही राजकीय पक्षाची हातोटी असते. ऐनकेनप्रकारे नेत्यांच्या सभेला कशी गर्दी दिसेल हा त्यांचा प्रयत्न असतो. पण सभेच्या गर्दीवरून अथवा खाली खुर्च्यावरून मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाही.
-डॉ. मोहन काशीकर, विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग