रामटेकमधील निकालाचे हादरे, कार्यकारिणी बरखास्त करत कामठीच्या मंडल अध्यक्षाची उचलबांगडी
By योगेश पांडे | Updated: June 5, 2024 22:53 IST2024-06-05T22:51:56+5:302024-06-05T22:53:03+5:30
कामठी मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तेथे महायुतीच्या उमेदवाराला चांगली आघाडी मिळेल असे अंदाज होते व तसेच पक्षाकडून दावे करण्यात येत होते

रामटेकमधील निकालाचे हादरे, कार्यकारिणी बरखास्त करत कामठीच्या मंडल अध्यक्षाची उचलबांगडी
नागपूर : रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा दारूण पराभव झाल्यामुळे भाजप पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात अनेक भाजपचे पदाधिकारी निष्क्रिय होते अशा चर्चा सुरू होत्या. निकालातून हे स्पष्ट झाले असून पक्षाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची होमपीच असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी याबाबत पत्र जारी केले आहे. पक्षाकडून याबाबत अगोदरच निर्णय घेण्यात आला होता व निकालाशी याचा काहीच संबंध नसल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
कामठी मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तेथे महायुतीच्या उमेदवाराला चांगली आघाडी मिळेल असे अंदाज होते व तसेच पक्षाकडून दावे करण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात श्यामकुमार बर्वे यांना १७ हजार ५३४ मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघातील काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित काम न केल्याची माहिती समोर आली होती. निकालानंतर कोहळे यांनी कामठीचे मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांनी पदावरून उचलबांगडी केली. तसेच कामठी शहर मंडळ भाजपची पूर्ण कार्यकारिणीदेखील बरखास्त केली आहे. मात्र याबाबत पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. ही कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय निवडणूकीअगोदरच घेण्यात आला होता. मात्र निवडणूक आटोपल्यावर पत्र जारी करण्याचे ठरविण्यात आले होते. याचा निवडणूकीशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.