लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:01 PM2019-03-18T14:01:05+5:302019-03-18T14:01:43+5:30

देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता.

Lok Sabha Nagpur, 1971; Jambuwantrao wins due power of Vidarbhavadi | लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता. तर १९७१ सालीदेखील विदर्भवादी नेत्यासमोरच कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. विशेष विशेष म्हणजे दोन्ही वेळेला कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा हेच उमेदवार होते. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव धोटे हे संसदेत पोहोचले.
१९७१ ची निवडणूक ही खरे तर मध्यावधी निवडणूक ठरली. त्या निवडणुकांमध्ये नागपुरातून पाच उमेदवार मैदानात होते. यात कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा, फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबुवंतराव धोटे, खोरिपाचे काट्टी अप्पा, भाकपाचे ए.बी.बर्धन, व अपक्ष उमेदवार वहाब होते. विशेष म्हणजे जनसंघाने या निवडणुकांत उमेदवार उभा केला नव्हता. १९६९ साली कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पक्ष दुभंगला होता. इंदिरा गांधी यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचा जास्त कल होता. विदर्भात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची लाटच दिसून येत होती. त्यामुळेच नागपूरची जागादेखील कॉंग्रेसला सहज मिळेल असा कयास वर्तविण्यात येत होता.
विदर्भाच्या आंदोलनामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले जांबुवंतराव धोटे हे यवतमाळ तसेच नागपूर अशा दोन्ही जागांवर उभे होते. धोटे हे १९६७ साली यवतमाळ येथून निवडणूक लढले होते, मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले होते. परंतु त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव मिळाला होता. विधिमंडळात १९६२ आणि १९६७ या दोन्ही निवडणुकांत जिंकून ते गेले होते व विदर्भवीर म्हणून त्यांची ओळख होती. स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन जोरात सुरू होते. धोटे यांच्याकडे विदर्भात अपेक्षेने पाहिले जायचे. त्यामुळे विदर्भवादी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे होते. ए.बी.बर्धन हेदेखील मोठे नाव होते व मागील निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर त्यांना यंदा यश मिळेल अशी आशा कामगार वर्गाला होती. त्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या जवळपास घटली व त्यामुळे प्रत्येकच पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मतगणना होत असताना प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक होता. कधी शर्मा तरी कधी धोटे समोर होते. प्रत्येक फेरीनंतर कल इकडेतिकडे होत होता. अखेर जांबुवंतराव धोटे यांना १ लाख २५ हजार ५५२ मतं (३७.०९ टक्के) मिळाली तर रिखबचंद शर्मा यांना १ लाख २३ हजार ४९६ मतं (३६.४८ टक्के) प्राप्त झाली. अखेरपर्यंत रंगलेल्या लढतीत धोटे यांनी २ हजार ५६ मतांनी बाजी मारली होती. कट्टी अप्पा यांना १६.२६ टक्के मतं मिळाली. तर ए.बी.बर्धन यांना केवळ ९.९७ टक्के मतं मिळाली व ते चौथ्या स्थानी राहिले. अपक्ष उमेदवाराला केवळ ६५१ मतं मिळाली व त्यांची जमानत जप्त झाली होती.शर्मांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. मात्र हा खटला धोटे यांनीच जिंकला.
-योगेश पांडे

Web Title: Lok Sabha Nagpur, 1971; Jambuwantrao wins due power of Vidarbhavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.