लोकसभा नागपूर १९९१; गड आला पण सिंह गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:18 AM2019-03-23T10:18:41+5:302019-03-23T10:19:23+5:30
१९९१ च्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: १९९१ च्या लोकसभा निवडणुका या नागपूर मतदारसंघासाठी नाट्यमय पद्धतीच्याच ठरल्या. काँग्रेसचे विद्यमान खासदार भगवान श्रीरामाच्या नावावर ऐन निवडणुकांच्या अगोदर भाजपात येतात काय आणि कधी न अनुभवलेली अस्वस्थता काँग्रेसचे खेम्यातील नेते अनुभवतात काय. मात्र अशा स्थितीतही लोकसभेचा कुठलाही अनुभव नसलेल्या दत्ता मेघे यांच्यावर कॉंग्रेसने विश्वास टाकला आणि ४६ उमेदवारांच्या भाऊगर्दीत त्यांनी यश संपादित करून नागपूरचा किल्ला राखला. मात्र निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती.
१९९१ च्या निवडणुकांच्या अगोदर मंडल आयोगामुळे देशाचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तर दुसरीकडे रामनामाचा ‘कमंडलू’ हातात घेऊन भाजपानेदेखील हिंदुत्वाच्या नावाखाली वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली होती. नागपुरातून अनेक हालचाली नियंत्रित होत होत्या. अशा स्थितीत कॉंग्रेसचे विद्यमान खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी राममंदिराचे समर्थन करत भाजपप्रवेश केला. यामुळे राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली होती. अशा स्थितीत कॉंग्रेससाठी तर नागपूरची जागा जिंकणे प्रतिष्ठेचाच विषय झाला होता. मात्र उमेदवारी द्यायची कुणाला हा मोठा प्रश्न होता. अनेकांची नावे समोर आली. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला व एकदाही लोकसभेची निवडणूक न लढविलेले दत्ता मेघे यांना पुरोहित यांच्याविरोधात उभे केले. खोरिपातर्फे मो.इकबाल अहमद तर बसपातर्फे सिद्धार्थ पाटील हे रिंगणात उभे होते. याशिवाय जोगेंद्र कवाडे, मोहन कारेमोरे यांच्यासोबत ३६ अपक्षदेखील उभे ठाकले. नागपूरच्या लोकसभा मतदारसंघात ४६ उमेदवारांनी एकमेकांना आव्हान दिले होते. प्रचार एकदम शिगेला पोहोचला होता. विदर्भात भाजपाकडे पारडे झुकले आहे, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत होते. २३ मे रोजी नागपुरात मतदान होणार होते.
मात्र २० मे रोजी देशाने काळा दिवस अनुभवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर येथे मानवी बॉम्बच्या माध्यमातून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे केवळ कॉंग्रेस पक्षच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरा बसला. निवडणूक अयोगाने मतदानाच्या तारखा ‘पोस्टपोन’ केल्या. अखेर १२ जून रोजी नागपुरात मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ही अवघी ४८ टक्क्यांच्या जवळपास होती.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जनतेची सहानभूती काँग्रेसला मिळाली व दत्ता मेघे निवडून आले. मेघे यांना ४५.९७ टक्के मतं मिळाली. तर पुरोहित यांच्या पदरी ३३.४५ टक्के मतं आली. मो.इक्बाल अहमद यांना १३.६२ टक्के तर सिद्धार्थ पाटील यांना २.०३ टक्के मतं प्राप्त झाली. कवाडे यांना १.०३ टक्के मतं मिळाली. उर्वरित ४१ मतदारांना मिळून ३.६३ टक्के मतं मिळाली. २७ उमेदवारांना पाचशेहून कमी मतं प्राप्त झाली होती.
‘ती’ राजीव गांधींची अखेरची सभा ठरली
दत्ता मेघे यांच्या प्रचारासाठी ८ मे १९९१ रोजी कस्तूरचंद पार्क येथे राजीव गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ च्या सुमारास ते नागपूर विमानतळावर पोहोचले होते व त्यानंतर चक्क खुल्या जीपमधून सर्वांचे स्वागत स्वीकारत ते बाहेर पडले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. आपल्या भाषणात राजीव गांधी यांनी अतिशय शांतपणे भाजप व जनता दलावर प्रहार केला होता. विदर्भाला वैधानिक विकास मंडळ देऊ, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले होते. रात्री उशीर झाला होता, मात्र तरीदेखील लोकांमधील उत्साह पाहून ‘मै आपके लिए और पाच मिनट ज्यादा बोलुंगा’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या सभेनंतरदेखील नागपुरात ‘राजीव’मय वातावरण होते. मात्र हे राजीव गांधी यांचे नागपुरातील अखेरचे भाषण ठरेल याची स्वप्नातदेखील कुणी कल्पना केली नव्हती.