लोकसभा नागपूर २००९; अखेरच्या षटकात विजयी चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:32 AM2019-03-29T11:32:46+5:302019-03-29T11:33:06+5:30
प्रत्यक्षात मुत्तेमवार यांच्यावर परंपरागत मतदारांनी परत एकदा विश्वास टाकला व ते सलग चौथ्यांदा निवडून आले. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी विजयी चौकार मारल्याप्रमाणेच हा त्यांचा विजय होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: २००९ सालची लोकसभा निवडणूक नागपुरात बदल घडवून आणेल अशा चर्चांमुळे तापली होती. पक्षांतर्गत असलेला विरोध, मतदारसंघाची पुनर्रचना आणि विरोधकांमधील आक्रमकता अशा स्थितीत तत्कालीन विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासाठी निवडणूक अवघड मानण्यात येत होती. मुत्तेमवारांवर भाजपात परत आलेले बनवारीलाल पुरोहित हे भारी ठरतील, असे राजकीय धुरिणांचे अंदाज होते. मात्र प्रत्यक्षात मुत्तेमवार यांच्यावर परंपरागत मतदारांनी परत एकदा विश्वास टाकला व ते सलग चौथ्यांदा निवडून आले. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी विजयी चौकार मारल्याप्रमाणेच हा त्यांचा विजय होता.
२००९ च्या निवडणुकांत संपुआसाठी सकारात्मक चित्र दिसून येत होते. ‘जय हो’ या गाण्याचा आधार घेत तयार केलेले प्रचारगीत गाजत होते. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर करत रालोआने ‘गुड गव्हर्नन्स’वर भर दिला होता. या निवडणुकीत राममंदिराचा मुद्दा मागे पडला होता. याशिवाय तिसरा व चौथा मोर्चा यांचेदेखील आव्हान होते.
२००४ च्या निवडणुकीत संपूर्ण विदर्भात कॉंग्रेसला केवळ नागपूरची जागा मिळाली होती. त्यामुळे यावेळीदेखील कॉंग्रेस नागपुरात पूर्ण तयारीनिशी उतरणार असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार विरुद्ध सतीश चतुर्वेदी हा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गटांमधून विस्तवही जात नव्हता. मुत्तेमवार यांना तिकीट मिळू नये यासाठी विविध नेते सरसावले होते. मात्र अखेरीस मुत्तेमवार यांनाच उमेदवारी घोषित झाली. या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती व पारंपरिक ‘व्होटबँक’ असलेला कामठीचा भाग रामटेक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला होता. सोबतच भारिप बहुजन महासंघाने साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर व बसपाने माणिकराव वैद्य यांना तिकीट दिले होते. त्यामुळे दलित मतदारदेखील या दोघांकडे वळण्याची शक्यता होती. दुसरीकडे बनवारीलाल पुरोहित परत एकदा भाजपाच्या झेंड्याखाली आले होते व भाजपाने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. बरिएमंतर्फे सुलेखा कुंभारे यादेखील रिंगणात होत्या. एकूण १३ अपक्षांसह नागपूर मतदारसंघातून २६ उमेदवार एकमेकांविरोधात उभे होते.
नागपुरात भाजपाचा चढता आलेख होता. महानगरपालिका, मेट्रो रिजन, डीपीडीसी, पदवीधर मतदारसंघ, विधान परिषदेच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या होत्या. मात्र थेट मैदान मारता आले नव्हते. या निवडणुकांत विकासाला मुद्दा बनविण्यात आले होते पुरोहितांचा जनसंपर्क, राजकारण व प्रशासनाचा दांडगा अ़नुभव यामुळे त्यांचे पारडे जड वाटत होते.
कामठी व नागपूर ग्रामीणचा भाग रामटेकमध्ये गेल्याने कॉंग्रेसला फटका बसेल असे चित्र होते. मात्र मिहान, आंतरराष्ट्रीय कार्गो, आंतरराष्ट्रीय विमानतळ यावर प्रचारादरम्यान विशेष ‘फोकस’ करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांना मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची सूचना केली होती. माणिकराव वैद्य हे भाजपाचे जिल्हाध्यक्षपद सोडून बसपाच्या हत्तीवर सवार झाले होते. शिवाय यशवंत मनोहर यांच्या बाजूने रिपब्लिक चळवळीतील अनेक जण प्रचारात उतरले होते. त्यामुळे कॉंग्रेसला निवडणूक जड जाणार असे सर्वांनाच वाटत होते. या निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले होते.
मात्र निकाल जाहीर झाल्यावर सर्वांना परत एकदा धक्का बसला. मुत्तेमवार यांनी २४ हजार ५९९ मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यांना ४१.५९ टक्के मतं मिळाली होती, तर पुरोहित यांच्या वाट्याला ३८.३७ टक्के मतं आली होती. माणिकराव वैद्य यांनी १५.६७ टक्के मतं घेत सर्वांनाच अचंबित केले होते. ही त्यांची तिसरी निवडणूक होती हे विशेष.
मनोहरांचा ‘लेटर’बॉम्ब
निवडणुकीच्या अगोदर राज्याचे माजी महाधिवक्ता व्ही. आर. मनोहर यांच्या एका पत्राने खळबळ उडाली होती. त्यांनी विधी क्षेत्रातील लोकांना पत्र पाठवून बनवारीलाल पुरोहित यांना मतं देण्याचे आवाहन केले होते. मनोहर यांचे समाजात एक मानाचे स्थान होते व ते प्रथमच अशा प्रकारे उघडपणे समोर आले होते. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आली आहे, असे पत्राच्या माध्यमातून त्यांनी म्हटले होते. यामुळे बरीच चर्चा झाली होती.