गाडी बुला रही हैं... लोकवाहिनीतून वर्षभरात तब्बल ६४८ कोटी नागरिकांचा प्रवास
By नरेश डोंगरे | Published: March 19, 2024 07:40 PM2024-03-19T19:40:08+5:302024-03-19T20:16:58+5:30
गतवर्षीच्या तुलनेत ५२ कोटी प्रवाशांची भर
नरेश डोंगरे, नागपूर : देशाची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने यंदा प्रवासी वाहतूकीचा नवा रेकॉर्ड केला आहे. अमिर-गरिब अशा सर्वच जणांना सामावून घेणाऱ्या रेल्वेने यंदा ६४८ कोटी प्रवाशांना देशभरातील विविध ठिकाणी प्रवास घडवून आणला आहे.
श्रीमंत - गरिब असा कलाही भेदभाव न करता भारतीय रेल्वे प्रत्येकाला त्याच्या ईच्छेनुसार पाहिजे त्या ठिकाणी प्रवास घडविते. प्रत्येकाच्या आर्थिक स्तरानुसार जनरलपासून एसीपर्यंत प्रवासाची व्यवस्था असल्याने श्रीमंत, अतिश्रीमंत आणि गरिबातील गरिब व्यक्ती एकाच वेळी एकाच रेल्वेगाडीतून प्रवास करताना दिसतात. म्हणूनच रेल्वेला भारताची लोकवाहिनी म्हणून ओळखले जाते. कोरोना काळात लोकहित डोळ्यासमोर ठेवून अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा संसर्गाचा धोका संपताच रेल्वेने पुन्हा नव्या दमाने भारतीय प्रवाशांना सेवा देणे सुरू केले आहे. नागरिकही प्रवासाची पहिली पसंती रेल्वेलाच देत आहेत. वर्ष २०२२-२३ ला भारताच्या कानाकोपऱ्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून ५९६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. आता यंदाच्या २०२३-२४ या वर्षांत १५ मार्चपर्यंत एकूण ६४८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांचा हा आकडा ५२ कोटींनी जास्त आहे. यावरून रेल्वेच्या प्रवासाला नागरिक कशी पसंती दर्शवितात, त्याचा प्रत्यय यावा.
नागपूर विभागातून ४.४०कोटी प्रवासी
नागपूर विभागातून वर्षभरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ कोटी, ४० लाख, एवढी आहे. मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मध्यप्रदेशातील शिवनी , पांढुर्णा पर्यंत विस्तारला आहे. या विभागातून रोज सरासरी १ लाख, ३१ हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
नागपुरातून २.१७ कोटी प्रवाशी
नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. येथून देशाच्या चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात आणि येतात. अशा या नागपूर स्थानकावरून एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या ११ महिन्यात २ कोटी, १७ लाख, ३७ हजार, ५५२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यावर्षीच्या एकट्या फेब्रुवारी महिन्यात १८ लाख, ९९ हजार, ८९७ नागरिकांनी प्रवास केला. नागपूरला मुख्य रेल्वेस्थानक आणि अजनी रेल्वे स्थानक ही दोन मोठी रेल्वे स्थानकं आहेत. या दोन्ही स्थानकांवरून दररोज सरासरी ६५,५०० प्रवासी प्रवास करतात.