लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:39 AM2017-11-07T00:39:02+5:302017-11-07T00:39:20+5:30
अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप करण्याºयावर ठोस कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप करण्याºयावर ठोस कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र नागपूरकरांना स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूरचा मंत्र देणाºया आणि पर्यावरणपूरक मेट्रो चालविण्याची हमी देणाºया महामेट्रो प्रशासनाने हायकोर्टाच्या आदेशाला तुडवत वर्धा रोड, काँग्रेसनगर ते अजनी चौकापर्यंतच्या मेट्रोच्या पिलरवर स्वत:च अवैध होेर्डिंग्ज लावले आहेत. उपराजधानीत होत असलेल्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसंदर्भातील हे होर्डिंग्ज आहेत. या स्पर्धेच्या प्रायोजकात महामेट्रोही आहे. मात्र नागरिकांना ब्रह्मज्ञान सांगणाºया मेट्रो बॅडमिंटन स्पर्धेच्या प्रचाराचे होर्डिंग्ज मेट्रोच्या पिलरवर लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सप्टेंबर महिन्यात वर्धा मार्गावर एका व्यावसायिकाने त्यांच्या दुकानाचा लोगो आणि उत्पादनाची माहिती देणारे दोन मोठ्या आकाराचे बॅनर मेट्रोच्या
पिलरवर लावले होते. याला महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांनी बेकायदेशीर कृत्य ठरविले होते. यासोबत मेट्रोच्या पिलरवर अवैध होेर्डिंग्ज आणि बॅनर लावणाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. लोकमतने १४ सप्टेंबर रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर महामेट्रो प्रशासनाने तत्काळ हे दोन्ही बॅनर हटविले होते.या कारवाईनंतर मेट्रोच्या पिलरवर बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावणाºयावर दंडात्मक कारवाई केली जाईल. यासोबतच यासंदर्भात धोरण निश्चित करणार असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले होते. मात्र लोकांना ब्रह्मज्ञान सांगणाºया महामेट्रोने स्वत:च्या आणि बॅडमिंटन स्पर्धेच्या प्रचारासाठी मेट्रोच्या पिलरवर असे होर्डिंग्ज लावणे चुकीचे नाही का? इतकेच काय अवैध होर्डिग्ज, बॅनर आणि शहर विद्रूपीकरणासंदर्भात हायकोर्टाचे आदेश मेट्रो प्रशासनाला मान्य नाही का, असा सवाल नागपूरकरांकडून केला जात आहे.
महापालिका, पोलीस काय करते ?
शहरात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर लावणाºयावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिका आणि पोलीस प्रशासनाची आहे. मात्र अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी महामेट्रोने लावलेले अनधिकृत होर्डिंग्ज मनपा आणि पोलिसांना का दिसत नाही, हेही एक आश्चर्यच आहे.
सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महामेट्रोकडे प्रायोजकत्व आहे. त्यामुळे महामेट्रोने हे होर्डिंग्ज लावले आहेत. यासोबतच मेट्रोच्या पिलरचा उपयोग जाहिरातीसाठी करता येईल, याची माहिती नागरिकांना व्हावी, हेही यामागील एक भावना आहे. भविष्यात मेट्रोच्या उत्पन्नवाढीसाठी मेट्रोच्या पिलरवर जाहिरात करण्याची परवानगी देण्यात येईल. सप्टेंबर महिन्यात एका व्यावसायिकाने दोन बॅनर लावले होते. पण ते नियमबाह्य होते. त्यामुळे ते काढण्यात आले होते.
- अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक, महामेट्रो