लोकमत अजिंक्य

By admin | Published: January 23, 2017 02:02 AM2017-01-23T02:02:03+5:302017-01-23T02:02:03+5:30

लोकमतने रविवारी अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी टाइम्स आॅफ इंडिया (टीओआय)

Lokmat Ajinkya | लोकमत अजिंक्य

लोकमत अजिंक्य

Next

अंतिम लढतीत टीओआयवर ३३ धावांनी मात : लोखंडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
नागपूर : लोकमतने रविवारी अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी टाइम्स आॅफ इंडिया (टीओआय) संघाचा ३३ धावांनी पराभव केला आणि १९ व्या ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) ओसीडब्ल्यू आणि एसबीआयच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत लोकमत संघाने खेळाच्या सर्वंच विभागात वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या लोकमत संघाने २० षटकांत ५ बाद १४३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. निराशाजनक सुरुवातीनंतर शरद मिश्रा (४४ धावा, ३६ चेंडू, १ षटकार, ३ चौकार) आणि कर्णधार अमित खोडके (३८ धावा, ३३ चेंडू, ४ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. त्यानंतर नितीन श्रीवासने १३ चेंडूंना सामोरे जाताना २९ धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. त्याआधी, लोकमतची सुरुवातीला ६.४ षटकांत ३ बाद ३० अशी अवस्था झाली होती. आक्रमक नितीन पटारिया (११) आणि प्रवीण लोखंडे (६) धावबाद झाल्यामुळे संघाचा डाव अडचणीत आला होता.पण, त्यानंतर मिश्रा व खोडके यांनी डाव सावरला आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.
प्रत्युत्तरात खेळताना टीओआय संघाने विकेट गमावल्या. त्यांचा डाव २० व्या षटकांत ११० धावांत संपुष्टात आला. सलामीवीर प्रतीक सिद्धार्थ (४७) याने एकाकी झुंज दिली. त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. लोकमततर्फे प्रवीण लोखंडे, नितीन श्रीवास व नितीन पटारिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
अंतिम सामन्यानंतर ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय राय, स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक विनायक कुलकर्णी, क्रीडा संयोजक अनिल अहिरकर, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप मैत्र, एनयूडब्ल्यूजे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, दृष्टी कम्युनिकेशन्सचे संजय चिंचोळे तसेच दादासाहेब बालपांडे कॉलेज आॅफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला महाजन यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे सदस्य डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले तर कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी आभार मानले.(क्रीडा प्रतिनिधी)


संक्षिप्त धावफलक
लोकमत २० षटकांत ५ बाद १४३ ( शरद मिश्रा ४४, अमित खोडके ३८, नितीन श्रीवास २९, नितीन पटारिया ११, प्रवीण लोखंडे ६; सूरज नायर, संदीप दाभेकर व विनय पांडे प्रत्येकी एक बळी). टीओआय २० षटकांत सर्वबाद ११० (प्रतीक सिद्धार्थ ४७, रुपेश भाईक १४, मंदार मोरोणे, पीयूष पाटील व संदीप दाभेकर प्रत्येकी १०; प्रवीण लोखंडे २-६, नितीन श्रीवास २-१७, नितीन पटारिया २-२५, शरद मिश्रा व आशिष बुधोलिया प्रत्येकी १ बळी).
निकाल : लोकमत ३३ धावांनी विजय.
सर्वोत्तम झेल - नितीन पटारिया.
वैयक्तिक पुरस्कार
सर्वोत्तम खेळाडू : प्रवीण लोखंडे (लोकमत), सर्वोत्तम फलंदाज : विनय पांडे (टीओआय), सर्वोत्तम गोलंदाज : शरद मिश्रा (लोकमत), सर्वोत्तम यष्टिरक्षक : अमित खोडके (लोकमत), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : रुपेश भाईक (टीओआय), अंतिम सामन्यातील सामनावीर : शरद मिश्रा (लोकमत). पाच बळी घेणारे गोलंदाज : शरद मिश्रा (लोकमत) आणि प्रवीण लोखंडे (लोकमत). शतकवीर फलंदाज : प्रवीण लोखंडे (लोकमत).
 

Web Title: Lokmat Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.