लोकमत व एमएसबीटीईच्या दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा नागपुरात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:03 PM2018-02-06T12:03:32+5:302018-02-06T12:06:14+5:30
लोकमत व महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एमएसबीटीई) संयुक्त विद्यमाने बुटीबोरी येथील लोकमतच्या प्रिंटिंग युनिटमध्ये आयोजित दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात झपाट्याने तंत्रज्ञानात बदल होत आहे. हे बदलते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शिक्षकांना आधी स्वत:मध्ये बदल करावे लागतील. नवे तंत्रज्ञान माहीत करून घेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावे लागेल. भविष्यात इंजिनियरिंग क्षेत्रात होणारे बदल आपल्याला आताच समजून घ्यावे लागतील, असे मत एमएसबीटीईचे उपसचिव डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
लोकमत व महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एमएसबीटीई) संयुक्त विद्यमाने बुटीबोरी येथील लोकमतच्या प्रिंटिंग युनिटमध्ये आयोजित दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी झाला.
या शिबिरात विदर्भातील पॉलिटेक्निक क्षेत्रात कार्यरत शिक्षक सहभागी झाले. यात इंजिनियरिंगच्या विविध शाखा जसे मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग व पॅकेजिंग बाबत प्रशिक्षण दिले जात आहे. शुभारंभ प्रसंगी एमएसबीटीईचे ओएसडी प्रोफेसर प्रफुल्ल सोनकांबळे, लोकमतचे संचालक (तांत्रिकी ) रमेश बोरा, वरिष्ठ महाव्यवस्थापक (निर्मिती) राजेंद्र पिल्लेवार, वरिष्ठ व्यवस्थापक (निर्मिती) गजानन शेंडे, व्यवस्थापक (मेकॅनिकल) आनंद नानकर, व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल्स) नरेश राऊत उपस्थित होते. संचालन उपव्यवस्थापक शैलेश आकरे यांनी केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी त्यांना प्रेझेंटेशनद्वारे मुद्रणाची आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मुद्रण प्रक्रिया दाखविण्यात आली. महत्वपूर्ण प्रशिक्षण मिळाल्यामुळे शिक्षकांमध्ये नवऊर्जा निर्माण झाली होती. एमएसबीटीईच्या कंचन इंगोले समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळावे : बोरा
लोकमतचे संचालक (तांत्रिकी) रमेश बोरा म्हणाले, विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळाले तर ते योग्य वेळी सुरक्षितरीत्या काम करू शकतील. उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज असते व असे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षक करतात. प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये दररोज ‘टार्गेट’ असते. ते गाठण्यासाठी वेळेत सुरक्षितरीत्या काम करणे आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले.
तांत्रिक सत्रात समजावले बारकावे
शिबिरात चार तांत्रिकी मार्गदर्शनाचे सत्रही आयोजित करण्यात आले. यात ट्रेड व तंत्रज्ञान, मेकॅनिकल इंजिनियरिंग, प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये आॅटोमेशनचा प्रयोग, प्रिंटिंगमध्ये इंजिनियरिंग व तंत्रज्ञानाला चालना देणे आदी विषयावर माहिती देण्यात आली. शिक्षकांना प्रिंटिंगची कार्यप्रणाली प्रत्यक्षरीत्या जाणून घेता आली. तज्ज्ञांनी शिक्षकांच्या शंकाचे समाधान करीत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. शनिवार देखील चार सत्र होतील.