लोकमत, हितवाद, पुण्यनगरी आघाडीवर
By admin | Published: January 2, 2015 12:49 AM2015-01-02T00:49:24+5:302015-01-02T00:49:24+5:30
गतविजेत्या लोकमत संघाने अ गटातून तसेच हितवाद आणि पुण्यनगरी संघाने ब गटातून प्रत्येकी आठ गुणांची कमाई करीत १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत आघाडी संपादन केली
उपांत्य फेरीसाठी चुरस : अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट सामने
नागपूर : गतविजेत्या लोकमत संघाने अ गटातून तसेच हितवाद आणि पुण्यनगरी संघाने ब गटातून प्रत्येकी आठ गुणांची कमाई करीत १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत आघाडी संपादन केली असून अन्य संघ उपांत्य फेरीच्या चढाओढीत कायम आहेत. स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशन ट्युटोरियल्स हे सहप्रायोजक आहेत.
अ गटात लोकमतने ओळीने दोन्ही सामने जिंकून आठ गुणांची कमाई केली. टाइम्स आॅफ इंडियाचे देखील आठ गुण आहेत पण या संघाने लोकमतपेक्षा एक सामना जास्त खेळला. दै. भास्करने लोकसत्ताला नमवित गुणांचे खाते उघडले. दुसरीकडे देशोन्नतीने दोन्ही सामने गमविल्याने त्यांची गुणांची पाटी कोरी आहे.
ब गटात माजी विजेत्या हितवाद सह पुण्यनगरीने दोन्ही सामने जिंकून प्रत्येकी आठ गुणांची कमाई केली. दुसरीकडे गत उपविजेता सकाळला पहिल्याच सामन्यात हितवादकडून पराभवाचा धक्का बसला. त्यांना उद्या शुक्रवारी पुण्यनगरीवर विजय मिळवावा लागेल. त्या दृष्टीने सकाळसाठी ‘करा किंवा मरा’ अशी लढत असेल. या गटातील अन्य दोन संघ तरुण भारत आणि लोकशाही वार्ता यांनी अद्याप विजय मिळविलेले नाहीत. या दोन्ही संघांकडून काही अनपेक्षित निकालाची प्रतीक्षा राहील. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे मानकरी ठरणाऱ्या खेळाडूंना दिले जाणारे मॅन आॅफ द मॅचचे पुरस्कार संजय चिंचोळे यांनी त्यांचे वडील गंगाधरराव चिंचोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कृत केले आहेत.
उद्या दि.२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० पासून सकाळविरुद्ध पुण्यनगरी हा सामना डॉ. आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर तसेच लोकमतविरुद्ध लोकसत्ता हा सामना वसंतनगर मैदानावर खेळविला जाईल.(क्रीडा प्रतिनिधी)