Lokmat Deepotsav 2021 : ‘लोकमत दीपोत्सव’ आला! दिवाळीचे दिवे लागण्याआधी मान्यवरांच्या हस्ते नागपूरमध्ये समारंभपूर्वक प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:32 AM2021-10-27T08:32:01+5:302021-10-27T08:32:27+5:30
Lokmat Deepotsav 2021 : ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली.
नागपूर : आवर्जून वाचावं असं मराठीत काही लिहिलंच जात नाही, लिहिलं तर कुणी वाचत नाही, काही वाचायला हल्ली वेळ कुठे असतो कुणाकडे?... अशा सगळ्या नकारघंटांना खणखणीत उत्तर देत तीन लाख प्रतींच्या वितरणाचा पल्ला गाठणारा ‘दीपोत्सव’ हा ‘लोकमत’चा बहुचर्चित दिवाळी अंक यावर्षी दिवाळीचे दिवे लागण्याआधीच सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली.
हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन श्रीकांत दातार यांची सखोल मुलाखत, ‘पोलीस’ नावाच्या एका खदखदत्या जंगलात फिरून केलेली मुशाफिरी, शरीर व्यवहारांच्या नग्न व्यापाराने गजबजलेल्या पोर्न फिल्म्सच्या चोरट्या जगाच्या खिडक्या उघडणारा विशेष रिपोर्ताज आणि आकाराला येत असलेल्या राममंदिराच्या बरोबरीने बदलणाऱ्या, न बदलणाऱ्या जुन्या-नव्या अयोध्येच्या भटकंतीत भेटलेल्या माणसांची सचित्र कहाणी हे यंदाच्या दीपोत्सवाचे काही खास आकर्षण बिंदू आहेत.
दोन वर्षांच्या कोविड काळाने सटपटलेल्या मनांना दिलासा देणाऱ्या काही विशेष लेखांचा खास विभाग - ए जिंदगी, गले लगा ले! - या अंकाचं संदर्भमूल्य वाढवतो. कोरोनाच्या आधीही माणसाच्या तगून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा पाहणारे अनेक कालखंड येऊन गेले. त्यांच्या खिडक्या उघडून पाहणारी ही विशेष लेखमाला यावर्षीच्या दीपोत्सवाचे सूत्र आहे.
अंकाच्या प्रती सर्वत्र उपलब्ध होत असून आपल्या वृत्तपत्र विक्रेत्यांशी संपर्क साधून वाचकांना आपली प्रत आरक्षित करता येऊ शकेल.
अंकाविषयी अधिक माहिती आणि ऑनलाइन खरेदीसाठी : deepotsav.lokmat.com ला भेट द्यावी.