लोकमत दिवाळी उत्सव २०१८ प्रसिद्ध झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:51 AM2018-11-08T10:51:48+5:302018-11-08T10:57:32+5:30
राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे.
देशात सुरू असलेल्या विद्यमान घडामोडी आणि नव्या वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकांबाबतचा, मोदी विरुद्ध राहूल असा परिसंवाद या अंकाचे मुख्य आकर्षण ठरला आहे. या परिसंवादात काँग्रेसचे खजिनदार अहमद पटेल यांची विशेष मुलाखत वाचता येणार आहे. त्याचसोबत प्रकाश जावडेकर, दत्तप्रसाद दाभोळकर, प्रकाश बाळ जोशी, सुरेश भटेवरा आणि संकल्प गुर्जर यांचे समीक्षापर लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
भारतातील समधर्मसमभावा पुढील आव्हाने या विषयावर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि सुरेश द्वादशीवार यांचे चिंतनपर लेख आहेत.
समाजावर आपल्या प्रतिभेची, कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या व्यक्तिंच्या विलक्षण व्यक्तिरेखा या अंकाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. ज्यांच्या निधनाने हिंदी साहित्यसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली अशा कवी नीरज यांच्या प्रतिभेविषयी सांगत आहेत, लक्ष्मीकांत देशमुख. बंडखोर लेखिका असा ज्यांचा परिचय आहे त्या कविता महाजन आणि ज्येष्ठ कवी तुळशीराम काजे या दोन साहित्यिकांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या निकटवर्तियांनी रेखाटल्या आहेत. अवघ्या देशात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, असे रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.गो. वैद्य उपाख्य बाबूराव यांची दमदार व्यक्तिरेखा रेखाटली आहे, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांनी. कायदा, समाजकारण, गांधीविचार आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रेसर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याविषयी लिहिले आहे, डॉ. रुपा कुलकर्णी यांनी. महाराष्ट्रातील स्त्री चळवळीला ज्यांनी गतीमान केले अशा विद्या बाळ यांच्याविषयी सांगत आहेत, गिताली वि.मं. तु. शं कुलकर्णी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे मधू जामकर यांनी. कथा विभागात वसंत आबाजी डहाके, गिरीजा कीर, महाबळेश्वर सैल, दामोदर मावजो, विश्राम गुप्ते, डॉ. विजया वाड, सुप्रिया अय्यर, द.ता. भोसले, रेखा बैजल, माधवी भट, जगदीश पाटील, राजा शिरगुप्पे या मान्यवरांच्या कथा आहेत. कविता विभागात चित्तरंजन भट, तुळशीराम काजे, प्रवीण दवणे, सदानंद देशमुख, रेषा आकोटकर, अनुपमा उजगरे, जुई कुलकर्णी यांच्यासह अनेक उत्तमोत्तम कवींचा समावेश आहे. सुधाकर नातू यांनी वर्तविलेले संपूर्ण वर्षाचे राशीभविष्य यात समाविष्ट केले आहे.