लोकमत मदतीचा हात : तरच पूर्ण होऊ शकते मोनालीचे अभियंता बनण्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:35 PM2019-06-18T21:35:15+5:302019-06-18T21:36:19+5:30
नुकतीच पॉलिटेक्निक उत्तीर्ण होऊन, मोनालीची अभियांत्रिकीच्या प्रवेशाची धडपड सुरू होती. अशात तिच्या काखेत आलेल्या एका छोट्या गाठीने, तिच्या स्वप्नांना ब्रेक लावला आहे. आज तिच्या शरीरातील ८० टक्के भागात ‘पस’ जमा झाला असून, त्याचा शरीरातील काही अवयवांवर परिणाम झाला आहे. सध्या काँग्रेसनगरातील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये ती भरती असून, घरची परिस्थिती आणि तिच्यावर उपचाराच्या खर्चाचा ताळमेळ बसविणे घरच्यांना अशक्य झाले आहे. त्यामुळे मोनालीच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या मदतीची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नुकतीच पॉलिटेक्निक उत्तीर्ण होऊन, मोनालीची अभियांत्रिकीच्या प्रवेशाची धडपड सुरू होती. अशात तिच्या काखेत आलेल्या एका छोट्या गाठीने, तिच्या स्वप्नांना ब्रेक लावला आहे. आज तिच्या शरीरातील ८० टक्के भागात ‘पस’ जमा झाला असून, त्याचा शरीरातील काही अवयवांवर परिणाम झाला आहे. सध्या काँग्रेसनगरातील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये ती भरती असून, घरची परिस्थिती आणि तिच्यावर उपचाराच्या खर्चाचा ताळमेळ बसविणे घरच्यांना अशक्य झाले आहे. त्यामुळे मोनालीच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या मदतीची गरज आहे.
दसरा रोड, गोंधळीपुरा, महाल येथील रहिवासी रवी व सुनीता भोसले यांची सर्वात लहान मुलगी मोनाली आहे. मोनाली क्रिकेट खेळाडू असून, महिला क्रिकेटमध्ये जिल्हास्तरावर ती खेळली आहे. २० वर्षाच्या मोनालीने नुकतेच पॉलिटेक्निक पूर्ण केले असून, ती पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार होती. वडील रवी भोसले हे स्कूल बसवर ड्रायव्हर आहे. त्यांना तीन मुली असून, मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. मधली मुलगी बीएससी करीत आहे. या तिन्हीमध्ये मोनाली अतिशय हुशार होती. वडिलांनी तिच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कर्जही उचलले होते. पण गेल्या १५ दिवसांपूर्वी तिच्या काखेत एक गाठ आली. त्यामुळे तिला उलट्या आणि संडासचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पण एक दिवस तिची प्रकृती अत्यवस्थ झाली. तिच्या वेगवेगळ्या टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या शरीरात ‘पस’ झाल्याचे सांगितले. ८० टक्के शरीरात ‘पस’ पसरला असून, हृदय आणि किडनीवरही त्याचा परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिला काँग्रेसनगरातील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून मोनालीवर उपचार सुरू आहे. ती सध्या व्हेन्टिलेटरवर आहे. आतापर्यंत झालेल्या उपचारांवर वडिलांचा पाच लाखावर खर्च झाला आहे. शिक्षणासाठी काढलेले कर्ज तिच्या उपचारावर खर्च झाले आहे. डॉक्टरांनी ती बरी होण्यासाठी किमान पाच लाख आणखी लागतील असे सांगितले आहे. मोनालीच्या वडिलांचे आर्थिक स्रोत संपलेले असल्याने वडील हतबल झाले आहे.
या गुणी मुलीच्या आयुष्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. समाजभान जपणाऱ्यांनी तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी तिला आर्थिक सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. तिच्या मदतीसाठी ज्या कुणाला हात पुढे करायचे असतील त्यांनी सुनीता रवी भोसले यांच्याशी ९३७२४७९६२७, ७७५५९९९२६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. अन्यथा पंजाब नॅशनल बँकेच्या न्यू शुक्रवारी शाखेत ८७४६०००१०००१३७५८ या खाते क्रमांकावर (आयएफएससी कोट : पीयुएनबी ०८७४६००) मदत करू शकता.