प्रभाव लोकमतचा :अखेर तो बोगस निवडणूक सर्व्हे हटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:04 AM2019-01-10T01:04:34+5:302019-01-10T01:05:16+5:30
भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्व्हे’ सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच हा बोगस निवडणूक ‘सर्व्हे’ संकेतस्थळावरून ‘डिअॅक्टिव्हेट’ करण्यात आला आहे. या ‘सर्व्हे’बाबत भाजपतर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्व्हे’ सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच हा बोगस निवडणूक ‘सर्व्हे’ संकेतस्थळावरून ‘डिअॅक्टिव्हेट’ करण्यात आला आहे. या ‘सर्व्हे’बाबत भाजपतर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली होती.
इंटरनेटवर ‘स्ट्रॉपोल’ या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन सर्व्हे’चे एक ‘पेज’ बनविण्यात आले होते. या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरच हा ‘सर्व्हे’ दक्षिण भाजपतर्फे घेण्यात येत असल्याचे नमूद होते. ‘२०१९ मध्ये दक्षिण नागपूूरचा आमदार कोण असावा’ असा प्रश्न यात विचारण्यात आला होता.
ही बाब लक्षात येताच भाजपचे महानगर सोशल मीडिया सेलतर्फे ७ जानेवारी रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही. ‘लोकमत’ने बुधवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच तातडीने हालचाली झाल्या. उच्चपातळीवरुनदेखील हा प्रकार गंभीरतेने घेण्यात आला व हा ‘सर्व्हे’ अखेर ‘डिअॅक्टिव्हेट’ करण्यात आला. विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते, आशीष वांदिले व रवींद्र भोयर यांची नावे या ‘सर्व्हे’मध्ये होती. या चौघांपैकी कोण आमदार व्हावा, असे विचारण्यात येत होते. यासंदर्भात पक्षाकडून कुठलीही अंतर्गत चौकशी होणार नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. हा राजकीय वातावरण तापविण्यासाठी जाणुनबुजून करण्यात आलेला खोडसाळपणा आहे की पक्षातील अंतर्गत स्पर्धेतून हा प्रकार करण्यात आला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.