लोकमत इम्पॅक्ट : २१९ दिवसानंतर धावणार आपली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 09:18 PM2020-10-26T21:18:19+5:302020-10-26T21:25:56+5:30
Apali bus, NMC, lastly run, Nagpur news कोरोनामुळे २१९ दिवसापासून बंद असलेली आपली बस उद्या बुधवारी २८ ऑक्टोबरपासून शहरातील रस्त्यांवर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे २१९ दिवसापासून बंद असलेली आपली बस उद्या बुधवारी २८ ऑक्टोबरपासून शहरातील रस्त्यांवर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस ३० टक्के क्षमतेने चालविल्या जाणार आहे. संक्रमण न वाढल्यास पुढे क्षमता वाढविण्याला अनुमती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धोरणानुसार बस चालविल्या जाणार आहे. यासंदर्भात परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
राज्यातील बहुतांश शहरात शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु नागपुरात या संदर्भात निर्णय होत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी होती. याचा विचार करता ‘लोकमत’ने मागील दोन महिन्यात अनेकदा वृत्त प्रकाशित करून याचा पाठपुरावा केला. याची दखल घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक सामाजिक संघ्टनांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. बस सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. परंतु मनपातील सत्तापक्षाने यावर बघ्याची भूमिका घतेली. राज्यातील अन्य शहरात बस सेवा सुरू झाल्याने प्रशासनाकडे बस बंद ठेवण्याला उत्तर नव्हते. सामान्य दिवसात नागपुरात रस्त्यावर ३६० बस धावतात. परंतु सुरुवातीला १२० ते १५० बस धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढवली जाणार आहे. बस सेवा सुरू करण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन बी., परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर परिवहन समितीने बैठक घेऊन या निर्णयाची माहिती दिली.
जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न
शहर बस सेवेसाठी मनपा अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षासाठी १०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ८५ कोटी खर्च झाले. शहर बस तोट्यात असल्याने जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करीत आहे. सत्तापक्षातील काही नेत्यांनी मेट्रो रेल्वेने शहर बसची जबाबदारी घ्यावी यासाठी प्रयत्न चालविला आहे. परंतु अद्याप मेट्रो आपल्या पायावर उभी राहिलेली नाही. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. पण यश मिळाले नाही.
नियमाचे पालन करावे लागेल-बोरकर
बुधवारपासून शहर बस सुरू होत आहे. परंतु कोविड संसर्ग टाळण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल. सुरक्षित अंतर व मास्क लावणे, सॅनिटायजेशन अशा नियमांचे पालन करावे लागेल, अशी माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.