लोकमत इम्पॅक्ट : मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित; तहसीलदारांनाही शोकॉज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:35 PM2020-06-27T23:35:25+5:302020-06-27T23:37:31+5:30
बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात ३.७७ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता प्रशासनाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल मंडळ अधिकारी व तलाठ्याला नागपूरच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी निलंबित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात ३.७७ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता प्रशासनाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल मंडळ अधिकारी व तलाठ्याला नागपूरच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी निलंबित केले आहे. तसेच तहसीलदारालाही शोकॉज नोटीस बजावली आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, हे विशेष.
गेल्या ४ जून रोजी या अवैध उत्खननाबाबतचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर तहसील प्रशासनाने कारवाई केली. इंदिरा चौधरी यांनी सांगितले की, बनवाडी गावात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन करण्यात आले आहे. तहसीलदारांनी आर्थिक दंडही ठोठावला आहे. परंतु या उत्खननाची माहिती प्रशासनाला दिली नाही. या प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकारीस्तरावर चूक झाली झालेली आहे. त्यामुळे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तहसीलदारांनी दंड ठोठावला असला तरी अवैध उत्खनन कुणी केले, याची माहिती त्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनाही शोकॉज देण्यात आला आहे.
बनवाडी गावाजवळ पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनने पहाडांना फोडून मैदान तयार केले जात होते. भूमाफियांच्या इशाऱ्यावर दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या अवैध उत्खननाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. परंतु ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी व नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांना स्पॉट पंचनामा करण्याचे निर्देश दिले. यानंतर लोकमतने सातत्याने हा विषय लावून धरला. काही दिवसापूर्वीच नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांनी पटवाऱ्याने केलेल्या पंचनामा रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना नोटीस जारी केली. तसेच ३ कोटी ७७ लाखाचा दंड ठोठावला. संबंधितांनी हा दंड न भरल्यास प्रशासन आणखी कठोर कारवाई करू शकते. वेळ पडली तर ती जागा सरकार आपल्या ताब्यातही घेऊ शकते.
निलंबनाची कारवाई करण्यात आली
या अवैध उत्खनन प्रकरणात दुर्लक्ष व निष्काळजीपणा करण्यात आला आहे. यासाठी तलाठी कडू आणि मंडळ अधिकारी बोरकर यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच तहसीलदार मोहन टिकले यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
इंदिरा चौधरी, उपविभागीय अधिकारी, नागपूर
सोमवारी जनसुनावणी
सोमवार २९ जून रोजी बनवाडी गावात अवैध उत्खननाबाबत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ही जनसुनावणी नवरमारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी ११.३० वाजता होईल. उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी या स्वत: स्थानिक नागरिकांकडून अवैध उत्खननाबाबत तक्रारी ऐकतील. या जनसुनावणीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, तसेच प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सर्वेही होणार
बनवाडी गावात सीमांकनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. याअंतर्गत जिल्हा स्तरावर सर्व्हेयरला गावात पाठवण्यात आले होते. यासोबतच जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयाचे पथक आणि तहसील प्रशासनाचे पथकास सहकार्य करायला सांगण्यात आले होते. परंतु या आठवड्यात पावसामुळे सीमांकनाची कारवाई होऊ शकली नाही. येत्या सोमवारी २९ जून रोजी पुन्हा बनवाडी गावातील सीमांकनाची कारवाई सुरु करण्यात येईल.