लोकमत इम्पॅक्ट : नागपूरच्या खामल्यातील अतिक्रमणाचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:11 PM2018-11-17T23:11:46+5:302018-11-17T23:16:45+5:30
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
अतिक्रमण विरोधी पथकाने अशोक हॉटेलसमोरील रॅम्प तोडले. शुभम गरमेंट्ससमोर अतिक्रमण करून बनवण्यात आलेले ओटेही तोडले. अंबिका एन.एक्ससमोर आणि येथील अनेक दुकानांनी, हॉटेल चालकांनी अतिक्रमण करून बनवलेले ओटे तोडण्यात आले. याप्रकारे एकूण २५ शेड, १५ ओटे तोडण्यात आले. या कारवाईत एक ट्रक माल जप्त करण्यात आला.
मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्या दुसऱ्या पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कारवाई केली. या पसिरातून २ ट्रक माल जप्त करण्यात आला. या कारवाईत प्रामुख्याने सहायक आयुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे, नितीन मंथनकर, संजय शिंगणे, जमशेद अली आदी उपस्थित होते.
फूटपाथ झाले होते गायब
खामला परिसरात बाजारातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली होती. फूटपाथ तर गायबच झाले होते. वाहन चालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे लोकमतने लक्ष वेधताच येथील अतिक्रमणाचा सफाया झाला.