प्रभाव लोकमतचा : अखेर त्या विद्यार्थ्यांनी केले मायदेशाकडे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:18 AM2020-03-20T00:18:51+5:302020-03-20T00:19:53+5:30
: ‘फिलिपीन्स’मध्ये शिकणारे व सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अखेर गुरुवारी मदत मिळाली. सायंकाळच्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी मुंबईकडे उड्डाण केले. या विद्यार्थ्यांमध्ये नागपुरातील दुर्वेश गाणार हा देखील एक विद्यार्थी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘फिलिपीन्स’मध्ये शिकणारे व सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अखेर गुरुवारी मदत मिळाली. सायंकाळच्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी मुंबईकडे उड्डाण केले. या विद्यार्थ्यांमध्ये नागपुरातील दुर्वेश गाणार हा देखील एक विद्यार्थी आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित करुन राज्य व केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधले होते.
‘फिलिपीन्स’मध्ये ‘कोरोना’चा कहर वाढल्याने तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थी दिल्लीमार्गे तर काही मुंबईमार्गे परतायला सुरुवात झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रातील ४० हून अधिक विद्यार्थी निघाले. त्यांचे विमान मलेशियामार्गे मुंबईला येणार होते. मात्र मलेशियातील विमानांना भारतात प्रवेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी सर्व विद्यार्थी विमानातच होते. मलेशियाला पोहोचल्यावर त्यांनी ही बाब कळाली. त्यानंतर सिंगापूर मार्गे मुंबईकडे जाता येईल असे त्यांना सांगण्यात आले. तब्बल १९ तासानंतर ते क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघाले व बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. परंतु त्यांना तेथून उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली.
यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘ऑनलाईन’ वृत्त प्रकाशित केले व त्यानंतर राज्य तसेच केंद्र प्रशासनाने तातडीने हालचालीला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधित विद्यार्थ्यांशी फोनवरुन संवाद साधला व त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्व विद्यार्थ्यांच्या जेवणाचीदेखील व्यवस्था विमानतळावर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दुपारी सिंगापूर एअरलाईन्सचे ‘बोर्डिंग पास’ देण्यात आले. सायंकाळी ६.५५ वाजता त्यांचे विमान मुंबईकडे झेपावले.
अन् घरच्यांचा जीव भांड्यात पडला
१७ मार्चपासून नागपूरकर दुर्वेश गाणारचे कुटुंबीय चिंतातूर झाले होते. मुलाला परत फिलिपीन्सला जावे लागते की काय ही काळजी त्यांना लागली होती. केंद्र व राज्य शासनाने तातडीने पावले उचलत सर्व मुलांच्या परत येण्याची व्यवस्था केली. दुर्वेश सातत्याने आमच्यादेखील संपर्कात होता. सायंकाळी ६.५५ वाजता उड्डाण करणाऱ्या विमानात आम्ही चढलो असे त्याने सांगितले अन् आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला. हे दिवस खरोखरच परीक्षेचे होते असे त्याच्या आई राजश्री गाणार यांनी सांगितले.