शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संदीपच्या मदतीला धावला मानवी हक्क आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 10:55 AM2023-09-05T10:55:37+5:302023-09-05T11:00:41+5:30
लोकमतच्या वृत्ताची दखल : आज घेणार ऑनलाइन सुनावणी
नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्येत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संदीप गवई या दिव्यांग खेळाडूला शासनाने उपेक्षित ठेवले. शासकीय नोकरीसाठी धडपड करताना निराशा आल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी अखेर त्याने चहा-पोह्याची गाडी सुरू केली आहे. लोकमतने ९ ऑगस्ट रोजीच्या अंकात ‘देशासाठी पदके मिळवली, आता विकतो चहा-पोहे’ या मथळ्याखाली यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मानवी हक्क आयोगाने स्वत:हून प्रकरण दाखल करून घेतले असून, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील राज्य मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्यात येणार आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संदीपने चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर त्याने १८ पदके पटकाविली आहेत. संदीप एका पायाने दिव्यांग आहे. या पदकांच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. क्रीडा आयुक्तालयातून २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात खेळाडूंची यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांची पडताळणी झाली; पण पुढे त्यावर काहीच निर्णय झाला नाही.
संदीपने नोकरी मिळावी म्हणून मंत्रालयाच्या चकरा मारल्या; पण काहीच साध्य झाले नाही. लोकमतने ९ ऑगस्ट रोजी संदीपची संघर्षगाथा मांडली. याची राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली व याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी तसेच सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत संदीप गवई यांना कळविण्याचे निर्देश क्रीडा व युवक सेवा संचालनालयास देण्यात आले. या आदेशाची दखल घेत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ४ सप्टेंबर रोजी पत्र जारी करीत गवई यांना ५ सप्टेंबर रोजी आयोजित सुनावणीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्यास कळविले आहे.
लोकमतने एका दिव्यांग खेळाडूच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्यामुळे मानवी हक्क आयोगाने माझ्या समस्येची दखल घेतली. सुनावणीतून काही मार्ग निघेल, अशी आशा आहे. या पाठबळासाठी लोकमतचे आभार.
- संदीप गवई, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित