लोकमत इम्पॅक्ट : अखेर एसटीने काढले बसेसचे नियोजन करण्याचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 09:23 PM2020-08-28T21:23:06+5:302020-08-28T21:24:28+5:30
एसटी बसची वाहतूक सुरू केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी पडत असल्याची स्थिती होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी बसची वाहतूक सुरू केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी पडत असल्याची स्थिती होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नागपूर विभागीय कार्यालयाने याबाबत पत्र काढून गणेशपेठ आगारांसह सर्व आगारांना बसेसचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने २० ऑगस्टपासून बसेसची वाहतूक सुरू केली. २१ आणि २२ आॅगस्टला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली. अचानक प्रवाशांची गर्दी झाल्यास बसेस कमी पडत असल्याचे चित्र होते. त्यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करून बसेसचे योग्य नियोजन करण्याकडे लक्ष वेधले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन विभाग नियंत्रकांनी सर्व आगारप्रमुखांना बसेसचे योग्य नियोजन करण्याबाबत तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्यास जादा बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रवाशांसाठी बसेस कमी पडू देणार नाही
बसेसचे योग्य नियोजन करण्याबाबत सर्व आगारप्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर प्रवाशांची गर्दी वाढल्यास जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग