लोकमत इम्पॅक्ट : महापालिकेचे डोळे उघडले, जन्माच्या दाखल्यावर टाकताहेत नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:26 PM2021-07-23T21:26:29+5:302021-07-23T21:26:59+5:30
NMC Birth Certificate १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका अनभिज्ञ होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे डोळे उघडले आणि जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका अनभिज्ञ होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे डोळे उघडले आणि जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या आरोग्य उपसंचालक व उपमुख्य निबंधक कार्यालयाच्या वतीने महापालिकेला ई मेल पाठवून संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ई मेलची पडताळणी केली. सोबतच आदेशाची सत्यता तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने पत्र लिहिण्यात आले. जन्म मृत्यु प्रमाणपत्र विभागाला आदेशाचा ई मेल आल्याची माहिती मिळाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. १५ वर्ष वयापर्यंत जन्माच्या दाखल्यावर नाव टाकता येऊ शकते. परंतु त्यापेक्षा अधिक वय झाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकणे बंद करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट, आधारकार्डसह अनेक कागदपत्रांवर नाव टाकण्यासाठी जन्माचा दाखला महत्वाचा असतो. राज्य शासनाने १५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे नाव जन्माच्या दाखल्यावर टाकण्याची सुविधा २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविली आहे. उल्लेखनिय म्हणजे राज्य शासनाने यापुर्वी जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्यासाठी तीन वेळा सवलत दिली आहे. सर्वात आधी २६ ऑक्टोबर २००५ पासून २५ ऑक्टोबर २००७, दुसऱ्यांदा एक जानेवारी २०१३ पासून १३ डिसेंबर २०१४ आणि १५ मे २०१५ पासून १४ मे २०२० पर्यंत सवलत दिली होती. पाच वर्ष नाव टाकण्याची सवलत दिल्याची अधिसुचना जारी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांमध्ये करणार जागृती
जन्म मृत्यु प्रमाणपत्र नोंदणी विभागाचे आरोग्य अधिकारी व उपनिबंधक डॉ. अतीक उर रहमान खान यांनी सांगितले की, जन्माच्या प्रमाणपत्रावर नाव टाकण्याचा कालावधी राज्य शासनाने एप्रिल २०२६ पर्यंत वाढविला आहे. या आदेशानंतर नाव नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येईल. ज्यांची नाव नोंद झाले नाही त्यांनी येऊन आपल्या नावाची नोंदणी करावी, असे ते म्हणाले.