‘लोकमत इम्पॅक्ट’ : अखेर क्वारंटाईनची शाई बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:12 AM2020-07-04T00:12:11+5:302020-07-04T00:14:13+5:30
रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घाईगडबडीत जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईनची शाई बदलली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घाईगडबडीत जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईनची शाई बदलली.
मोहननगर येथील रहिवासी रिचर्ड अँथोनी हे २५ जूनला रेल्वेगाडी क्रमांक ०२६९२ नवी दिल्ली-सिकंदराबाद स्पेशल रेल्वेगाडीने हैदराबादला गेले होते. ते १ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक ०२४३७ सिकंदराबाद-नवी दिल्लीने नागपूरला पोहोचले. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन करण्यासाठी स्टॅम्प लावण्यात आला. काही तासानंतर स्टॅम्प लावलेल्या ठिकाणची त्वचा सोलून निघत होती. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला होता. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या हातावर जखम झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला व त्यानंतर क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात आलेली शाई बदलण्यात आली.
शाई बदलण्यात आली
‘रेल्वेस्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर तो बाहेर जाईपर्यंत रेल्वे प्रशासन संबंधित प्रवाशाचा मोबाईल, पत्ता नोंदवून घेते. परंतु जिल्हा प्रशासनाने पुरविलेल्या स्टॅम्प आणि शाईचा शिक्का संबंधित प्रवाशाच्या हातावर लावण्यात येतो. प्रवाशाला जखम झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आम्ही त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी शाई बदलली आहे. यानंतर अशा घटना होणार नाहीत.’
एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग