लोकमत इम्पॅक्ट : जंग खात असलेल्या तोफांना अखेर मिळाली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:23 IST2020-09-11T00:22:05+5:302020-09-11T00:23:18+5:30
मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात मागील १० महिन्यापेक्षा अधिक काळापासून उघड्यावर पडलेल्या ब्रिटिशांच्या काळातील तोफांना अखेर जागा मिळाली आहे. ‘लोकमत’ने २८ ऑगस्टला या तोफा १० महिन्यापासून जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.

लोकमत इम्पॅक्ट : जंग खात असलेल्या तोफांना अखेर मिळाली जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात मागील १० महिन्यापेक्षा अधिक काळापासून उघड्यावर पडलेल्या ब्रिटिशांच्या काळातील तोफांना अखेर जागा मिळाली आहे. ‘लोकमत’ने २८ ऑगस्टला या तोफा १० महिन्यापासून जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
ब्रिटिशकालीन तोफा जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध करताच एका आठवड्याच्या आतमध्ये या तोफांसाठी शेड तयार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तोफांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संग्रहालय अभिरक्षकांची चर्चाही झाली आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांचे केमिकल कन्झर्व्हेशन आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाळ्यात कस्तूरचंद पार्कमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदकाम सुरु असताना ब्रिटिशकालीन आठ तोफा मिळाल्या होत्या. या तोफांना मूळ रंगरूप देण्यासाठी ४८ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. कोरोनामुळे मार्चपासून संग्रहालय बंद आहे. त्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही.
निधीची समस्या
तोफांना मूळ रुप देण्यासाठी स्टोन आणि आयरन कॉस्टींगसाठी एस्टीमेट तयार करण्यात आले होते. त्यांची चाकेही तयार करण्यात येणार आहेत. तोफांच्या माध्यमातून संग्रहालयाची भव्यता वाढविण्याची तयारी करण्यात येत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या कामासाठी निधीची तरतूद नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दुसऱ्या योजनेतून या योजनेवर मदतीची तरतूद करण्याचा विचार सुरू होता. परंतु त्यात यश मिळाले नाही. सध्या पाऊस सुरु असल्यामुळे तोफांची अवस्था खराब झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी शेड टाकण्यात आले आहे.