११ फेब्रुवारीला नागपुरात रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:38 AM2018-01-12T10:38:12+5:302018-01-12T10:43:35+5:30
‘आॅरेंजसिटी’अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आॅरेंजसिटी’अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. लोकमत समूहातर्फे ऐतिहासिक शहर औरंगाबाद तसेच नाशिक येथील प्रचंड यशानंतर आता राज्याच्या उपराजधानीत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली असून नोंदणी सुरू झाल्यापासून धावपटूंमध्ये नावनोंदणीसाठी चढाओढ सुरू आहे.
नाशिकपासून यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’चा श्रीगणेशा झाला आहे. नाशिक येथील उदंड प्रतिसादानंतर औरंगाबाद येथे १७ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आता ११ फेब्रुवारीला नागपुरात आयोजन होणार आहे. महामॅरेथॉनचा चौथा आणि अखेरचा टप्पा कोल्हापूर असेल. कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला आयोजन होणार आहे.
सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ‘लोकमत’ने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, फिटनेसविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि एकोपा वाढावा या उदात्त हेतूने ‘लोकमत’ समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. नाशिक तसेच औरंगाबादेत झालेल्या महामॅरेथॉनला क्रीडारसिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह देश-विदेशातील धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची ‘लोकमत’ समूहाची मॅरेथॉन असल्याची धावपटूंची प्रतिक्रिया होती. भोजवानी फुडस् हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर हे आहेत. आयोजनात मेघे ग्रूपचे नेल्सन मदर एण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे.
सहा लाखांहून अधिक रकमेची आकर्षक बक्षिसे
२१ कि.मी. (अर्धमॅरेथॉन)
फॅमिली रन (३ कि.मी.)
५ कि.मी. फन रन
१० कि.मी. पॉवर रन
२१ कि.मी. डिफेन्स गटासाठी विशेष असे बक्षीस करंडकरूपाने दिले जाणार आहे.
१० आणि २१ कि़मी.ची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूस त्या-त्या विभागाचा नकाशा असलेले मेडल्स दिले जाईल. नाशिक आणि औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना मेडल देण्यात आले. आता असेच मेडल अन्य दोन (नागपूर तसेच कोल्हापूर) शहरांत होणाऱ्या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना देखील मिळतील. धावपटूने चारही शहरांतील मॅरेथॉन पूर्ण करून मिळालेले मेडल्स जुळवल्यास, आपल्या ‘महाराष्ट्राचा’ नकाशा बनेल. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा चारही मॅरेथॉन जिंकून हे मेडल्स पटकावणारा धावपटू ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.