नागपुरात आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 09:04 AM2023-04-02T09:04:53+5:302023-04-02T09:05:41+5:30
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमत नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी, २ एप्रिल रोजी "भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?' या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी २.३० वाजता 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह' आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहतील.
एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, न्यूज १८चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नव्या टाइम्सचे कार्यकारी संपादक अंकू श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी सरिता कौशिक या परिषदेत मते मांडणार आहेत. परिषदेतील पहिल्या सत्राचे संवादक लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव, तर दुसऱ्या सत्राचे संवादक लोकमत समाचार, नवी दिल्लीचे सहयोगी संपादक संजय शर्मा असतील.
विदर्भातील तीनशेहून अधिक पत्रकार येणार
लोकमत समूहाने खास पत्रकारांसाठी आयोजित केलेली ही पहिलीच राष्ट्रीय परिषद असून, विदर्भातील पत्रकारांना एका महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे. विदर्भाच्या सर्व अकरा जिल्ह्यांमधून तीनशेहून अधिक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
'लोकमतचा इतिहास' चित्रकृतीचे अनावरण
लोकमतच्या वाटचालीचा इतिहास मांडणाऱ्या देखण्या चित्रकृतीचे अनावरण रविवारी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याहस्ते लोकमत भवनात होणार आहे. ख्यातनाम कलावंत श्री एम नारायण यांनी ही चित्रकृती साकारली असून 'लोकमत'चा ५० वर्षांचा प्रवास ९ बाय १९ फूट आकारात चित्रित करण्यात आला असून, 'पत्रकारिता परमो धर्म'च्या वाटचालीवर आधारित हे पेंटिंग लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांना अर्पण करण्यात येणार आहे.