लोकमत व्यासपीठ : विषमुक्त अन्नासाठी बीजोत्सव चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:07 AM2019-03-14T01:07:28+5:302019-03-14T01:10:32+5:30

दररोज आपल्या ताटात पडणारे अन्न किती सुरक्षित आहेत, याचा विचार आणि अभ्यास केल्यास आपण अक्षरश: विष पोटात घालत आहोत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सकाळी फवारणी करून सायंकाळी ताटात पडणारी भाजी, विषारी रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणी करून आणि त्याहीपेक्षा जेनेटिकली मॉडीफाईड (जीएम) केलेल्या बियाण्यांचे सेवन आपल्या अन्नातून होत आहे व हे विष हळूहळू शरीरात पोहचून नवनव्या आजारांना आमंत्रण देत आहे. जीएम वानांचा विरोध, रासायनिक खतांनी विषयुक्त झालेल्या अन्नाबाबत शहरी ग्राहकांमध्ये जनजागृती आणि देशी बियाणांचा पुरस्कार, असा उद्देश ठेवून या क्षेत्रातील तज्ज्ञ व मनस्वी लोकांनी सहा वर्षापूर्वी नागपुरात बीजोत्सवाला सुरुवात केली.

Lokmat platform: The Festival of the seeds movement for the poisonless food | लोकमत व्यासपीठ : विषमुक्त अन्नासाठी बीजोत्सव चळवळ

लोकमत व्यासपीठमध्ये बीजोत्सवबाबत माहिती देताना किर्ती मंगरूळकर, अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, रुपिंदर नंदा व हर्षल अवचट.

Next
ठळक मुद्देशेतकरी व शहरी ग्राहकांना जोडणारा दुवा : देशी बियाण्याला प्रोत्साहन, जनुकीय धान्याला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दररोज आपल्या ताटात पडणारे अन्न किती सुरक्षित आहेत, याचा विचार आणि अभ्यास केल्यास आपण अक्षरश: विष पोटात घालत आहोत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सकाळी फवारणी करून सायंकाळी ताटात पडणारी भाजी, विषारी रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणी करून आणि त्याहीपेक्षा जेनेटिकली मॉडीफाईड (जीएम) केलेल्या बियाण्यांचे सेवन आपल्या अन्नातून होत आहे व हे विष हळूहळू शरीरात पोहचून नवनव्या आजारांना आमंत्रण देत आहे. जीएम वानांचा विरोध, रासायनिक खतांनी विषयुक्त झालेल्या अन्नाबाबत शहरी ग्राहकांमध्ये जनजागृती आणि देशी बियाणांचा पुरस्कार, असा उद्देश ठेवून या क्षेत्रातील तज्ज्ञ व मनस्वी लोकांनी सहा वर्षापूर्वी नागपुरात बीजोत्सवाला सुरुवात केली. या मार्गदर्शक प्रदर्शनातून लोकांमध्ये जाणीव निर्माण झाली व सातत्याने जुळत गेलेल्या लोकांमुळे हे आयोजन विषमुक्त अन्नासाठीची लोकचळवळ ठरली. यातून सेंद्रीय धान्याला प्रोत्साहन आणि राबणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी ग्राहकांशी जोडण्याची किमया बिजोत्सवने केली.
डॉ. कीर्ती मंगरुळकर, शेतीतज्ज्ञ अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, प्रा. रुपिंदर नंदा व हर्षल अवचट यांनी लोकमत व्यासपीठच्या माध्यमातून बीजोत्सव कार्यावर प्रकाश टाकला.
शेतकरी व ग्राहकांना जोडले
पहिल्या वर्षी बीजोत्सवामध्ये केवळ मार्गदर्शनावर भर देण्यात आला होता. मात्र शुद्ध अन्न मिळेल कुठे, हा प्रश्न लोकांचा होता. त्यामुळे नागरिकांना प्रदर्शनाच्या ठिकाणी सेंद्रीय धान्य मिळावे यासाठी विदर्भातील अशा शेतकऱ्यांचा शोध सुरू झाला आणि दुसऱ्या वर्षी सेंद्रीय धान्य पिकविणाऱ्या १५ ते २० शेतकऱ्यांचे धान्य प्रदर्शनात ठेवण्यात आले. आश्चर्य म्हणजे या धान्याला नागरिकांची प्रचंड मागणी आली. सुरुवातीला विदर्भातीलच शेतकऱ्यांचा सहभाग होत होता. पण पुढे बीजोत्सवच्या प्रतिनिधींनी देशात वेगवेगळ्या कार्यक्रमात हा विषय मांडल्यानंतर इतरही ठिकाणचे लोक व शेतकरी प्रभावित झाले. त्यामुळे मागील वर्षी पंजाब, हरियाणा, यूपी, एमपीसह विविध राज्यातील शेतकरी यात सहभागी झाले. केवळ विदर्भातूनच जवळपास २०० शेतकरी बिजोत्सवशी जुळले असल्याची माहिती अमिताभ पावडे यांनी दिली. फॅमिली डॉक्टरप्रमाणे फॅमिली शेतकरी ही संकल्पना यातून मांडण्यात आली. शेतकरी ग्राहकांशी थेट जुळत असल्याने मध्ये कमाई करणारी दलालांची मक्तेदारी मोडण्याचा सफल प्रयत्न यातून होत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेंद्रीय धान्याच्या नावाने ग्राहकांची फसवणूक टाळण्याचा उद्देशही यातून पूर्ण झाल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जीएमला विरोध
जे शेकडो वर्षांपासून सक्षमपणे नैसर्गिकरीत्या टिकू शकले व मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी लाभदायक राहिले आहेत, अशा देशी बियाण्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि शेतकरी, पर्यावरण व लोकांचे आरोग्य या तिन्ही गोष्टींना नुकसानकारक असलेल्या जनुकीय प्रक्रिया (जीएम) केलेल्या बियाण्यांविरोधात लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने २०१३ साली बीजोत्सवला सुरुवात झाली. हा पहिलाच प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला. शुद्ध अन्न मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि रासायनिकऐवजी शेणखतापासून तयार सेंद्रिय अन्नधान्याबद्दल लोकांमध्ये जाणीव निर्माण झाली. लोक जुळत गेले आणि भरघोस प्रतिसाद मिळत गेला. पहिल्या वर्षी ४०० ते ५०० लोकांवरून मागील वर्षी पाचव्या प्रदर्शनात १५ ते २० हजार लोकांनी भेट दिल्याचे डॉ. कीर्ती मंगरुळकर यांनी सांगितले.
सेंद्रिय पद्धत व देशी बियाणेच का?
जीएम बियाणे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम क रून वेगवेगळे आजारही निर्माण करीत आहे, शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे घातक आहे. जीएम बियाण्यांना अधिक पाण्याची गरज आहे आणि त्यांना कीड लागण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे जीएम बियाणे शेतकऱ्यांऐवजी खते व कीटकनाशक विकणाऱ्यांना लाभदायक आहेत. उलट देशी बियाण्याला पाणी कमी लागत असून पर्यावरणालाही धोका नाही. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठीही ते आवश्यक असून, आतापर्यंत शेतकऱ्यांना त्याचा लाभही झाला असल्याचे पावडे यांनी स्पष्ट केले.
युवक आणि महिलाही जुळल्या
हर्षल अवचट हा मेकॅनिकल इंजिनीअर. दुसऱ्या वर्षी त्याने बीजोत्सवला भेट दिली आणि तेथील कृषी मालाचे प्रदर्शन व मार्गदर्शनाने तो प्रभावित झाला आणि कायमचा या उपक्रमाशी जुळला. येथे केवळ कृषिमालच नाही तर प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शनही मिळत असल्याने स्वत:च्या रोजगारासह शेतकऱ्यांसाठी काही करता येते का, यासाठी त्याच्यासारखे अनेक तरुण कार्य करीत आहेत. मोठ्या प्रमाणात शहरी महिला व महिला शेतकरीही या उपक्रमाशी जुळल्या आहेत.
शहरवासीयांना मिळाले प्रोत्साहन
शहरातील कचरा व्यवस्थापनावर कार्य करणाऱ्या प्रा. रुपिंदर नंदा यांनी जेव्हा बीजोत्सवला भेट दिली तेव्हा त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळाली. त्यांनी वस्तीतील काही महिलांना एकत्र करून जवळ रिक्त पडलेल्या जागेवर सामूहिक शेतीला सुरुवात केली. मंदिरातील निर्माल्य, उसाचे वेस्ट व घरातील असा कचरा गोळा करून शेणखतात मिश्रण करून बेड बनविण्यात आले. त्यावर पालेभाज्या, शेंगा, कोबी, लवकी आदींची लागवड केली गेली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. बीजोत्सवमधून मिळालेल्या मार्गदर्शनाने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. घराच्या गच्चीवर टेरेस गार्डन करून हा प्रयोग केला जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता त्या व त्यांच्यासारख्या अनेक महिला या उपक्रमाशी जुळल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय खाद्यपदार्थांचे प्रमुख आकर्षण
केवळ सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देणाऱ्या लोकांना सेंद्रीय अन्न व पारंपरिक अन्नाचा आस्वाद घेता यावा, यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी ही बीजोत्सव प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. भरड धान्याचे जेवण, मोहफुल बोंड, लाखोरी डाळीचे वडे आणि अशा असंख्य पदार्थांची चव लोकांना बीजोत्सव प्रदर्शनात घेता येणार असल्याचे सुषमा खोब्रागडे यांनी सांगितले. कृषिविषयक मार्गदर्शनासह प्रक्रिया केलेले सेंद्रीय धान्य, हळद, मिर्ची पावडर, मसाले, डाळी, गहू, तांदूळ, कृषी उपकरणे असे बरेच काही या प्रदर्शनात मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीडशेहून अधिक महिला शेतकरी या सर्व उपक्रमांशी जुळल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी नवीन काही
गुरुवार १५ मार्चपासून म्यूर मेमोरियल लॉन, महाराजबाग रोड येथे बीजोत्सवला सुरुवात होणार आहे. सकाळी उद्घाटनानंतर विविध विषयांवर चर्चासत्र व त्यानंतर कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महिला शेतकऱ्यांचे संमेलन व तांदळाच्या वानांवर मार्गदर्शन होईल. सायंकाळी युवा शेतकरी संमेलन तर शेवटच्या दिवशी ग्राहकांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांशी जुळण्यासाठी लोकांनी बीजोत्सवाला भेट देण्याचे आवाहन डॉ. कीर्ती मंगरूळकर यांनी केले.

 

Web Title: Lokmat platform: The Festival of the seeds movement for the poisonless food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.