सुरेल, सुमधुर भावगीतांची रंगणार ‘लोकमत सखी मंच दिवाळी पहाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 10:07 PM2022-10-17T22:07:48+5:302022-10-17T22:08:40+5:30
Nagpur News शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाइन्स येथील हिस्लॉप कॉलेजच्या मागे चिटणवीस सेंटरच्या प्रांगणात भोजवानी फूड्स लिमिटेडच्या वतीने ‘लोकमत सखी मंच दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर : दीपावली म्हणजे भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठ्ठा सण. पंचपक्वान्न, फराळ आणि पावसाळ्यानंतर वातावरणात प्राप्त झालेल्या नावीन्याचा सोहळा म्हणजेच दीपावली. दीपावलीचे स्वागत जसे दीप लावून केले जाते. तसेच सुरेल भावगीतांनी वातावरणात रमणीयता प्रदान होत असते. अशा वेळी जर प्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या स्वरांनी सजलेले ‘गीतरामायण’ कानावर पडत असतील आणि तेही सूर्योदयाच्या समयी तर गोष्टच न्यारी व्हायची. ही संधी ‘लोकमत सखी मंच दिवाळी पहाट’च्या अनुषंगाने नागरिकांना प्राप्त होत आहे. शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाइन्स येथील हिस्लॉप कॉलेजच्या मागे चिटणवीस सेंटरच्या प्रांगणात भोजवानी फूड्स लिमिटेडच्या वतीने ‘लोकमत सखी मंच दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘दिवाळी पहाट’मध्ये श्रीधर फडके आणि वाद्यवृंद गौरवपूर्ण अशा ‘गीतरामायण’चे सादरीकरण प्रभातीला करणार आहेत. ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून विख्यात असलेले गदिमा उपाख्य ग. दि. माडगुळकर रचित ‘गीतरामायण’ श्रीधर फडके यांचे वडील बाबूजी उपाख्य सुधीर फडके यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केले होते. गदिमा आणि बाबूजींकडून मिळालेल्या गीतरामायणाच्या या वारसा स्पर्शाने श्रीधर फडके यांनी असंख्य रसिकांची मने तृप्त केली आहेत. ही तृप्तता शुक्रवारी रमा एकादशीच्या पहाटे नागपूरकरांना प्राप्त होणार आहे. भोजवानी फूड्स लिमिटेड आणि लोकमत सखी मंचच्या वतीने सादर होणारी ही दिवाळी पहाट अविस्मरणीय अशी ठरणार आहे. या कार्यक्रमाला चिटणवीस सेंटरचे सहकार्य लाभले आहे. दिवाळी पहाटसाठी लोकमत सखी मंच सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय सादर आमंत्रित असून नि:शुल्क प्रवेशिका लोकमत सखी मंच कार्यालयातून उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांच्याशी ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
.....................