लोकमत सरपंच अवॉर्डचे थाटात वितरण : येणीकोणीचे मनीष फुके ठरले 'सरपंच ऑफ द इयर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:19 PM2019-11-23T20:19:04+5:302019-11-23T20:25:07+5:30
संपूर्ण नागपूरचे लक्ष लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डचे शनिवारी थाटात वितरण झाले. नरखेड तालुक्यातील येणीकोणी या ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष भय्याजी फुके हे ’सरपंच ऑफ द इयर’ ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण नागपूरचे लक्ष लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डचे शनिवारी थाटात वितरण झाले. नरखेड तालुक्यातील येणीकोणी या ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष भय्याजी फुके हे ’सरपंच ऑफ द इयर’ ठरले. त्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील १३ ग्राम पंचायतींनाही विविध गटामध्ये पुरस्कार मिळाला. या ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे पार पडलेल्या या भव्यदिव्य लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याला माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, लोकमतचे संचालन (परिचालन) अशोक जैन, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष (इव्हेंट) अनिरुद्ध हजारे, बीकेटीचे जुबेर शेख, दीपक बनकोटी, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन.के. नायक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत सरपंच अवॉर्डसाठी नागपूर जिल्ह्यातील एकूण २० पेक्षा अधिक ग्राम पंचायतींनी अर्ज केले होते. यापैकी १४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. १३ विविध निकषांवर ही निवड करण्यात आली. यामध्ये (जलव्यवस्थापनासाठी) वैशाली तेजराव टेकाडे सरपंच, बोरगाव ता. कळमेश्वर, (वीज व्यवस्थापन) सचिन कृष्णराव इंगळे सरपंच, वेळा हरिश्चंद्र ता. नागपूर, (शैक्षणिक सुविधा) धनश्री ढोमणे सरपंच फेटरी, ता. कळमेश्वर, (स्वच्छता) प्रांजल राजेश वाघ सरपंच, कडोली ता. कामठी, (आरोग्य) मनिषा पडोळे सरपंच, चिंचाळा ता. भिवापूर, (पायाभूत सुविधा) नरेश रामभाऊ भोयर, सरपंच पिंपळा (घोगली ता. नागपूर, (ग्राम रक्षण) सुवर्णा प्रशांत साबळे, सरपंच रनाळा, ता. कामठी, (पर्यावरण संवर्धन) दिलीप डाखोळे, सरपंच, वरोडा ता. कळमेश्वर,
(प्रशासन ई-प्रशासन-लोकप्रशासन) मीनाक्षी वाघधरे, सरपंच, किरणापूर ता. रामटेक, (रोजगार निर्मिती) मंजुषा गेडाम, सरपंच नवरगाव, ता. रामटेक, (कृषी तंत्रज्ञान) राजेंद्र दुधबडे सरपंच, पेंढरी (देवळी) ता. हिंगणा, (उदयोन्मुख नेतृत्व) प्रशांत देवीदास कामडी सरपंच, नगरधन, ता. रामटेक, आणि येरखडाता. कामठी येथील सरपंच मंगला मनिष कारेमोरे यांना स्पेशल ज्युरी अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
प्रास्ताविक लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी केले. संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
२२० कोटीची डीपीसी ७७८ कोटीवर : चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी मंत्री किंवा पालकमंत्री झालो त्याचा मला अभिमान नाही. परंतु पालकमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षात मला जे काम करता आले त्याचे मला समाधान आहे. २०१४ साली नागपूर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ही २२० कोटी रुपयांची होती. गेल्या पाच वर्षात विविध योजना व निधी आणत ती आज ७७८ कोटी रुपयापर्यंत नेऊन ठेवली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याला यापुढे ७७८ कोटी रुपयापेक्षा कमी पैसा मिळणार नाही. विविध विकास कामे करता येणे शक्य होईल. गेल्यावर्षी मी पालकमंत्री असताना ज्या गामपंचायतींना लोकमत सरपंच अवॉर्ड मिळाला होता त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाख रुपयाचा विशेष निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला. आज मी आमदार नाही, मंत्री नाही तर सार्वजनिक जीवनात काम करताना मी नेहमीच तुमच्यासोबत राहील, असा विश्वासही माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात लोकमतने मला भरपूर प्रेम दिले. मी लोकमत परिवारातीलच एक असल्यासारखी वागणूक दिली. माझ्या कठीण काळातही लोकमत माझ्यासोबतच राहिला, याची मला नेहमीच जाणीव राहील, असेही ते म्हणाले
विजय दर्डा यांनी एक व्हीजन दिले आहे. ते म्हणजे लोकमत सरपंच अवॉर्डच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण व समृद्ध व्हावे, हे आहे. ऑरेंज फेस्टिव्हल आज महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन महोत्सव बनले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरी संत्र्यांला एक जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य विजय दर्डा यांनी केले आहे.
पुरस्कृत ग्रा. पं. ला ५ लाखाचा विशेष खासदार निधी : खा. कृपाल तुमाने
लोकमत सरपंच अवॉर्ड प्राप्त सरपंचांच्या ग्रामपंचायतींना माझ्या खासदार निधीतून ५ लाखाचा विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा खा. कृपाल तुमाने यांनी यावेळी केली. मार्गदर्शन करताना खा. तुमाने म्हणाले, सरपंच म्हणून काम करताना किती अडचणी येतात याची मला जाणीव आहे. सरपंच हा गावाच्या विकासासाठी आमदार, खासदार, डीपीसी असा मिळेल तो निधी आणण्याचा प्रयत्न करीत असतो. खासदारांनाही मर्यादा आहे. ५ कोटी रुपये मिळतात. जिल्ह्यात १९१६ गावे आहेत. प्रत्येक गावाला ५ लाख रुपयाचा निधी दिला तरी केवळ ५० गावांनाच निधी देता येतो, इतर गावे निधी अभावीच राहतात.
शहराचा विकास म्हणजे केवळ देशाचा विकास नाही. आजही गाव विकासापासून वंचित आहेत. त्यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे खा. तुमने म्हणाले. लोकमतने सुरु कलेला हा सरपंच अवॉर्ड असाच निरंतर सुरु राहील, अशी अपेक्षाही खा. तुमाने यांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायत मजबूत तर राष्ट्र मजबूत : विजय दर्डा
ग्रामपंचायत हा देशातील एक महत्त्वाचा घटक आहे. देशाला मजबूत करण्याची, समृद्ध करण्याची आणि लोकांचे जीवनमान बदलवण्याची ताकद ग्रामपंचायतीमध्ये आहे. त्यामुळे ग्राम पंचायत मजबूत असेल तर राष्ट्र मजबूत होईल, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या निदर्शनास हे नुकसान आणण्यासाठी लोकमत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. राज्यपाल व केंद्र सरकारने मदत निधी जाहीर केला. परंतु ही मदत तुटपुंजी आहे. ती कशी वाढवून देता येईल, यासाठी खासदार म्हणून तुमाने यांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरपंचांनी व सदस्यांनी आपापल्या गावाला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. ग्राम विकासाच्या या पर्वात लोकमत सदैव सोबत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दर्डा यांनी यावेळी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले. ते पालकमंत्री असताना त्यांनी लोकमत सरपंच अवॉर्डमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना त्यांनी शासनाकडून दहा लाखाचा विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. लोकमत ही मदत विसरणार नाही. बावनकुळे ज्या क्षेत्रात राहतीलतेथे चांगलेच काम करतील, लोकमत नेहमीच त्यांच्यासोबत राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तुषार सूर्यवंशी यांच्या सप्तखंजेरीने केले प्रबोधन
सप्तखंजेरीवादक समाजप्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सप्तखंजेरीतून समाजप्रबोधन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या ग्राम स्वराज्य व ग्रामोन्नतीचा संदेश त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. यावेळी तुषार सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच जिल्हा माहिती अधिकारी विशेष प्रभार अनिल गडेकर, संजय धोटे आणि सिराज सय्यद यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.