लोकमतची उपांत्य फेरीत धडक
By admin | Published: January 5, 2015 12:51 AM2015-01-05T00:51:11+5:302015-01-05T00:51:11+5:30
गतविजेत्या लोकमतने दैनिक भास्करचा १६९ धावांनी पराभव करीत स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धा
नागपूर : गतविजेत्या लोकमतने दैनिक भास्करचा १६९ धावांनी पराभव करीत स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. टाइम्स आॅफ इंडिया संघानेही अंतिम चार संघात स्थान मिळविले.
वसंतनगर मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत दैनिक भास्कर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. लोकमतने निर्धारित २० षटकांत २१० धावांची दमदार मजल मारली. सामनावीर नितीन श्रीवासने नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. अमित रोशनखेडेने नाबाद ५३ धावा फटकाविल्या. अमितने २१ चेंडूंना सामोरे जाताना ही अर्धशतकी खेळी साकारली. त्यात ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. सलामीवीर शरद मिश्रानेही (५० धावा, ४० चेंडू, १ षटकार, ७ चौकार) अर्धशतक झळकाविले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दैनिक भास्कर संघाचा डाव ६.३ षटकांत ४१ धावांत संपुष्टात आला. सचिन रहांगडालेने २७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत दैनिक भास्कर संघाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सचिन खडके (४-१२) याची योग्य साथ लाभली. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या लढतीत लोकसत्ता संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ९४ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना टाइम्स आॅफ इंडिया संघाने विजयासाठी आवश्यक धावा १३.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.
सोमवारी या स्पर्धेत पुण्यनगरी विरुद्ध हितवाद (डॉ. आंबेडकर महाविद्यालय मैदान) आणि सकाळ विरुद्ध तरुण भारत (वसंतनगर मैदान) यांच्यादरम्यान सामने होतील. दोन्ही सामने सकाळी ९.३० वाजता प्रारंभ होतील. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
१) वसंतनगर मैदान : लोकमत २० षटकांत ३ बाद २१० (नितीन श्रीवास ६५, अमित रोशनखेडे नाबाद ५३, शरद मिश्रा ५०; बंडू ढोरे व सूजन प्रत्येकी १ बळी) मात दैनिक भास्कर ६.३ षटकांत सर्वबाद ४१ (राहुल ठाकूर १९; सचिन रहांगडाले ५-२७, सचिन खडके ४-१२).
निकाल : लोकमत १६९ धावांनी विजयी. सामनावीर : नितीन श्रीवास.
२) डॉ. आंबेडकर महाविद्यालय मैदान : इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ता २० षटकांत ६ बाद ९४ (मंदार मोरणे १७, सुदर्शन साखरकर १५, हर्षवर्धन दातीर १३;
फझुल कमर ३-११, संदीप दाभेकर, पीयूष पाटील प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध टाइम्स आॅफ इंडिया १३.२ षटकांत ५ बाद ९७ (सुहास नायसे ३२, सुबोध रत्नपारखी १९, फैझुल कमर व सूरज नायर प्रत्येकी १० धावांवर नाबाद; शरद परतेकी ४-३१).
निकाल : टाइम्स आॅफ इंडिया ५ गड्यांनी विजयी. सामनावीर : फैझुल कमर.