लोकमत स्पेशल: चेन्नईतही पकडले टर्टल स्मगलर्स; तस्करांचे भोपाळ, झांसी, उन्नाव कनेक्शन
By नरेश डोंगरे | Published: October 2, 2023 11:08 PM2023-10-02T23:08:56+5:302023-10-02T23:09:41+5:30
म्होरक्या बसला उत्तर प्रदेशात
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : 'टर्टल स्मगलिंग'चा नागपुरात भंडाफोड होताच या तस्करीत गुंतलेल्या विविध प्रांतातील आरोपींमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पकडले जाण्याची कुणकुण लागताच एमपी, यूपीतील आरोपी भूमीगत झाले असून, येथील अधिकाऱ्यांच्या माहितीवरून आज चेन्नईतील दोन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
जीटी एक्सप्रेसमध्ये सीआयबी, डीआरआय आणि आरपीएफने संयुक्त कारवाई करून दुर्मिळ प्रजातीचे आणि अत्यंत माैल्यवान असे ४८३ कासवं जप्त करण्यात आले. एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी तसेच कासवांसह तपासही वनविभागाच्या वाईल्ड लाईफ विभागाला सोपविण्यात आला. आयएसएफ भारतसिंह हाडा यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखत अटकेतील आरोपींची कस्टडी मिळवली. त्यानंतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळी तपास पथके झांसी, भोपाळ आणि युपीतील उन्नाव येथे रवाना केली. दरम्यान, कोट्यवधी रुपयांची कासवं आणि ती घेऊन निघालेले साथीदार नागपूर येथे पकडण्यात आल्याचे कळताच 'टर्टल स्मगलर्स' अलर्ट झाले. त्यांनी आपापले मोबाईल बंद करून अड्ड्यावरून पळ काढला. त्यांचा जागोजागी शोध घेतला जात आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, हे सिंडिकेट उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून चालविले जाते. त्यांचे कनेक्शन मध्यप्रदेशातील भोपाळ आणि झांसीमध्ये आहे तर हे सर्व तस्कर चेन्नईतील मेन मंडीशी जुळले आहेत. ते नागपूर मार्गे नेहमीच कासवांची तस्करी करून कोट्यवधी रुपये कमवितात. अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीची स्थानिक अधिकाऱ्यांनी चेन्नईतील अधिकाऱ्यांना दिली आणि काही तस्करांची नावेही कळविली. त्याआधारे सोमवारी चेन्नईत दोन तस्करांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जाते.
श्रीलंका, मॅनमारसह अनेक देशात तस्करी
अत्यंत दुर्मिळ असलेल्या माैल्यवान 'मुकूटमनी टर्टल' (कासव)ची विदेशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे चेन्नईतून सागरी मार्गाने श्रीलंका, मॅनमारसह विविध देशात त्याची तस्करी केली जात असल्याचे सांगितले जाते. कोट्यवधींचे वारेन्यारे करणारी ही तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू होती, अशीही माहिती आता पुढे आली आहे.