लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:53 PM2020-03-19T22:53:57+5:302020-03-19T22:56:37+5:30

आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे.

Lokmat 'On the Spot': Strict security arrangements for travelers from overseas | लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख

लोकमत ‘ऑन द स्पॉट’: विदेशातून आलेल्या प्रवाशांची कडक सुरक्षा व्यवस्थेत देखरेख

Next
ठळक मुद्देआमदार निवास : २४ तास डॉक्टरांच्या पथकासह कर्मचारीही उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार निवासातील चेहरा सध्या बदललेला दिसून येत आहे. इमारत क्रमांक २ कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. इमारतीसमोरच पोलीसवाले ठाण मांडून बसले आहेत. गेटसमोरच पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. यासोबतच महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही तैनात आहेत. याशिवाय आमदार निवास परिसरात जागोजागी विशेष सावधगिरी बाळगली जात आहे. याला कारणही तसेच आहे. येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने विदेशातून आलेल्या लोकांचे विलगीकरण कक्ष (क्वॉरंटाईन) ची व्यवस्था करण्यात आली आहे.


लोकमतची चमू गुरुवारी दुपारी आमदार निवासात पोहोचली. तेव्हा इमारत क्रमांक २ कडे जात असतानाच पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले. दही व ताकाचे स्टॉलही होते. जागोजागी हात धुण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली दिसून आली. तिथे सॅनिटायझर नव्हते. परंतु कॅन्टिनमध्येच नियंत्रण कक्ष बनवण्यात आले आहे. या कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, इमारत क्रमांक २ व ३ ला सॅनिटाईझ करून ठेवले आहे. खोलीतील टेबलावर सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण ठेवले होते. क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक खोलीत दोन बेड आहे. त्याचे अंतर ५ ते ६ फूट आहे. टी. टेबल, खुर्चीसुद्धा देण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत दोघांना ठेवण्याची व्यवस्था आहे, परंतु येथे केवळ एका खोलीत एकालाच ठेवण्यात आले आहे. आमदार निवासात सध्या विदेशातून आलेले ४१ प्रवासी दाखल आहेत. इमारतीमध्ये प्रवेश करताच डॉक्टरांची एक खोली आहे. येथे आरोग्य विभाग व मनपाचे डॉक्टर तैनात आहेत. ते येथे ठेवण्यात आलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीसुद्धा तैनात आहेत.


कर्मचाऱ्यांना विशेष युनिफॉर्म
आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जात आहे. देखरेखीत ठेवण्यात आलेल्या लोकांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विशेष युनिफॉर्म देण्यात आले आहे. ते स्वत: पूर्ण शरीर झाकूनच आत प्रवेश आहेत. इमारतीच्या गेटवर एक टेबल ठेवला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरून जेवण आल्यास ते बाहेरच्या टेबलावर ठेवावे लागते. त्याची तपासणी केल्यानंतर कर्मचारी तो डबा संबंधितांपर्यंत पोहोचवतात.

सध्या ४१ जण दाखल
आमदार निवासातील विलगीकरण कक्षात आज गुरुवारी पहाटे कतार एअरवेजने आलेल्या २० जणांना थेट विमानतळावरूनच आमदार निवासात आणण्यात आले. आमदार निवासातील इमारत क्रमांक २ व ३ येथील २१० खोल्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. एका खोलीमध्ये एकाच व्यक्तीला ठेवण्यात आले आहे. आमदारांसाठी राखीव असलेल्या या खोल्या विस्तीर्ण व सुविधाजनक आहेत. काल गुरुवारी २६ जण दाखल होते. त्यात २० जणांची भर पडली, असे एकूण ४६ जण झाले. यापैकी ६ जणांना घरी सोडण्यात आले. त्यातील एक जण पुन्हा येथेच परत आला. त्यामुळे सध्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ४१ जण दाखल आहेत.


आम्ही येथेच राहणार
सरकारने जाहीर केलेल्या दहा देशांमधून येणाºया प्रवाशांना थेट आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात आणले जात आहेत. येथे येणारे व्यक्ती रुग्ण नाहीत. त्यांना केवळ खबरदारी म्हणून येथे १४ दिवस एकांतात ठेवण्यात येत आहे. यापैकी अनेकांना डॉक्टरांनी तपासून करून घरीच क्वॉरंटाईनसाठी पाठवले. काल बुधवारी २६ जणांपैकी ६ जणांना घरी पाठवण्यात आले होते. परंतु यापैकी १ जण परत आला असून त्याने घरच्यापेक्षा आमदार निवासात राहण्यालाच पसंती दिली. तसेच आज गुरुवारीसुद्धा ८ जणांना घरी जाण्यास परवानगी मिळाली असून यापैकी दोघांनी येथे राहणे पसंत केले आहे. घरच्यापेक्षा आमदार निवासातच त्यांची चांगली काळजी घेतली जाऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

भोजन-नाश्त्यांची नि:शुल्क व्यवस्था, वायफायचीही सुविधा
आमदार निवासात ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी चहा, नाश्त्यासह भोजनाचीही नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील कँटिनमध्येच त्यांचे भोजन तयार होत आहे. सकाळी ७ वाजता चहा-नाश्ता दिला जात आहे. दुपारी १२ वाजेपासून जेवणाची व्यवस्था आहे. जेवण डिस्पोजेबल प्लेटमध्ये दिले जात आहे. सर्वांनाच मिनरल वॉटर उपलब्ध करण्यात आले आहे. येथे थांबलेले लोक आपल्या आवडीचे जेवण घरूनसुद्धा मागवू शकतात. कॅन्टीनमधून किंवा घरून येणारे जेवण गेटच्या बाहेर असलेल्या टेबलवर ठेवले जाते. तपासणीनंतरच ते संबंधितांपर्यंतच पोहोचवले जाते.

कुटुंबीय काय म्हणाले...
देखरेखीत ठेवण्यात आलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दूर ठेवण्यात आले आहे. अशा वेळी कुटुंबीय डबा आणून देण्यासाठी किंवा काही काम असेल तरच आमदार निवासात येत आहेत. असेच काही जणांच्या कुटुंबीयांशी लोकमतने चर्चा केली असता ते येथील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेने अतिशय संतुष्ट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पहिल्या दिवशी थोडी अव्यवस्था होती, पंरतु ती दूर करण्यात आली असून आता अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे. वायफायची सुविधा असल्याचे येथे थांबलेले विद्यार्थी आपल्या अभ्यासाला लागले आहेत.

काउन्सिलिंगचीही व्यवस्था
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, देखरेखीत ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी काउन्सिलिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या लोकांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांचेही काउन्सिलिंग केले जात आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या मनातील संशय दूर करून त्यांना काय करावे, काय करू नये, याची माहिती देत आहेत.

दिशा-निर्देशांचे पालन
जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या दिशा-निर्देशांचे पालन होत आहे. सध्या २१० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आवश्यकता पडली तर याची संख्या वाढवता येईल. नागभवनमध्येही व्यवस्था केली जाईल.
जनार्दन भानुसे
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Lokmat 'On the Spot': Strict security arrangements for travelers from overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.