लोकमत स्टिंग ऑपरेशनचा दणका : ‘ए- १’ बीअर शॉपीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:49 PM2019-04-25T20:49:47+5:302019-04-25T20:55:58+5:30
गोधनी रोडवरील ‘ए-१ बीअर शॉपीमध्ये ‘काऊंटर सेल’ची परवानगी असतानाही ग्राहकांना आतमध्ये घेऊन बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याचा प्रकार लोकमतने ‘स्टिंग ऑपरेशन’ करीत चव्हाट्यावर आणला. याची दखल घेत उत्पादन शुल्क विभागाने संबंधित बीअर शॉपी विरोधात विभागीय गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोधनी रोडवरील ‘ए-१ बीअर शॉपीमध्ये ‘काऊंटर सेल’ची परवानगी असतानाही ग्राहकांना आतमध्ये घेऊन बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याचा प्रकार लोकमतने ‘स्टिंग ऑपरेशन’ करीत चव्हाट्यावर आणला. याची दखल घेत उत्पादन शुल्क विभागाने संबंधित बीअर शॉपी विरोधात विभागीय गुन्हा दाखल केला आहे.
ए-१ बीअर शॉपीमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून फक्त ‘काऊंटर सेल’ करण्याची परवानगी आहे. मात्र, असे असतानाही येथे समोरचे दार उघडून ग्राहकांना आतमध्ये घेतले जाते व आतील भागात त्यांना बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’ कडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. याची दखल घेत मुंबई विदेशी मद्य नियम ३५,३७,४१ तसेच अनुज्ञप्ती अट क्रमांक ६ व ७ चे उल्लंघन केल्याच्या कारणावरून संबंधित बीअर शॉपी संचालकाविरुद्ध विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांनी २३ एप्रिल रोजी या ‘ए-१ बीअर शॉपी’ची आकस्मिक तपासणी केली होती. त्यावेळीही शॉपीच्या आतमध्ये ग्राहकांना बीअर पिण्याची सोय उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे निरीक्षणाच्या वेळी अनुज्ञप्तीचा मूळ मंजूर नकाशा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे बीअर शॉपीमध्ये उपस्थित असलेले एकनाथ विठ्ठल सावरकर यांची चौकशी करून त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता.