लोकमत प्रेरणावाट : असाही एक वाढदिवस,दिले २१ लाखांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 08:50 PM2019-12-30T20:50:43+5:302019-12-30T20:56:56+5:30
शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली.
साधारणत: प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतो. परंतु, गुप्ता यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत समाजाकरिता नि:स्पृह भावनेतून काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांना देणगी देऊन एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. रविवारी झालेल्या या छोट्याशा समारंभाला महापौर संदीप जोशी, आमदार अनिल सोले, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त विवेक मसाळ, गुप्ता यांचे वडील गुलाबचंद गुप्ता व कुटुंबातील अन्य सदस्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वाट चुकलेल्या दुर्दैवी भगिनींच्या मुलांचे पालकत्व घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले व अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा येथे फासे पारधींच्या मुलांसाठी शाळा चालवीत असलेले मतिन भोसले यांना यावेळी प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. याशिवाय योगाभ्यासी मंडळ, दीनदयाल थाळी, महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, पोद्दारेश्वर राममंदिर, तेलंखेडी हनुमान मंदिर, नारायण कुटुंब संस्था, नेकी का पिटारा आदी संस्थांनाही गुप्ता यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, हॉटेल कर्मचाऱ्यांना समाधानकारक निवृत्ती वेतन मिळेल, अशी आर्थिक तरतूदही त्यांनी या वाढदिवसाचे निमित्त साधून केली.