Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 20:13 IST2022-05-14T20:12:38+5:302022-05-14T20:13:17+5:30
Nagpur News महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी लोकमत वुमेन समिट २०२२ च्या व्यासपीठावर व्यक्त केले.

Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात'
नागपूर : आता महिला प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने काम करीत असून त्यांना पुरुषांकडून प्रोत्साहनही मिळते. त्यांना कायद्याची साथही मिळत आहे. महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी येथे व्यक्त केले.
‘लोकमत वुमेन समिट’ च्या नवव्या पर्वात ’आज मैं ऊपर’ या पॅनल चर्चेत अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, बाल तस्करीविरुद्ध देशात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सुनिता कर आणि बॉलिवूड अभिनेत्री रसिका दुग्गल यांनी परखड मत मांडले.
रसिका दुग्गल म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्री पुरुषप्रधान असून महिला कठोर परिश्रमाने काम करतात. पण, या इंडस्ट्रीत आपल्या टर्मवर काम करू शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत काम करताना अनेक काही शिकायला मिळते. करिअरमध्ये अनेक स्थितीचा सामना केला आहे. गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते, ही चांगली गोष्ट आहे. अशा लोकांसोबत काम करण्याचा आनंद मिळतो. आता कथेत अभिनेत्रींना प्रथम स्थान असते तर काही कथेत महिला केंद्रस्थानी असतात. सर्वच क्षेत्रात काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी असतातच. कामावर प्रेम असेल तरच फिल्म इंडस्ट्रीत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सुनिता कर म्हणाल्या, जीवनात अनेक अडचणी आल्या. वयाच्या १६ व्या वर्षी बाल तस्करीत फसले. तीन वर्ष खोलीत बंद होते. घर, समाज, शिक्षण सोडावे लागले. हिमतीच्या बळावर देशात बाल तस्करी बंद करण्यासाठी लढा सुरू केला. यातून संपूर्ण तस्करी बंद करण्याची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, तस्करांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि चुप्पी साधू नये, असे आवाहन त्यांनी केले. बाल तस्करीविरुद्धच्या लढ्यात पोलीस, वकिल आणि कायद्याचे सहकार्य हवे तसे मिळत नाही. अनेकांशी लढावे लागते. या क्षेत्रात जनजागृतीची गरज आहे. संसदेत तस्करी बिल मंजूर होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. आरती सिंग म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाला की मुलगी, हा आईचा पहिला प्रश्न असतो. मुलगा झाल्यानंतर आनंद आणि मुलगी झाल्यानंतर दुख: होते. मुलगी बोझ नसते. मुलगा सर्वांना हवा असतो, मुलगी का नाही, ही समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मलाही दोन मुली आहेत. समाजात मुलीला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. यशस्वी व्हा आणि पालकांना निर्णय घेण्यास बाध्य करा. चूल आणि मूल ही आताही महिलेची जबाबदारी आहे. भामरागड, मालेगाव येथे स्वनेतृत्त्वावर विश्वास ठेवून काम केले. याकरिता पत्रकारांकडून ‘कडक सॅल्यूट’ मिळाला. कधीही हार मानू नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
पॅनल चर्चेचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.