पंख होते तो तूम क्या करती? - ‘ऑपरेशन गंगा’फेम शिवानी कालरांचा थेट प्रश्न, भीती वाटली तर तुम्ही काय करता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 16:02 IST2022-05-14T15:52:57+5:302022-05-14T16:02:10+5:30
Lokmat Women Summit 2022 : ऑपरेशन गंगा फेम शिवानी कालरा आणि ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांनी सांगितली आकाशात उत्तुंग भरारी घेण्याच्या जिद्दीची जिगरबाज गोष्ट.

पंख होते तो तूम क्या करती? - ‘ऑपरेशन गंगा’फेम शिवानी कालरांचा थेट प्रश्न, भीती वाटली तर तुम्ही काय करता?
कशाला हवी कुणाची परवानगी, बायकांना कुणी का द्यावी आकाशात झेप घ्यायची इजाजत? त्यांनी का असा विचार करावा की पंख होते ते क्या होता? बायकांना पंख नाहीत हे कोण ठरवणार? खरंतर ते बायकांनी स्वत: स्वत:ला सांगायला हवं की पंख मला आहेतच, प्रश्न फक्त एकच आणि तो ही जिने तिने स्वत:लाच विचारायचा आहे, पंख होते तो तूम क्या करती? आणि शोधायचं त्याचं उत्तर. खरंतर आपण असे प्रश्न पुरुषांना विचारतो का, त्यांच्यासाठी आकाश खुलं, त्यांच्या पंखात बळ, मग बायकांना का विचारावं. मुद्दा एवढाच आहे, आपण आपल्याला रोखलं नाही तर दुसरं कुणीच आपल्याला रोखू शकत नाही. ‘ऑपरेशन गंगा’फेम एअर इंडिया पायलट शिवानी कालरा सांगत असताना ‘उडण्याच्या’ स्वप्नातलं बळ. लोकमत आयोजित लोकमत वुमेन समिटमध्ये शिवानी सांगत होत्या बुलंद हौसल्यांची गोष्ट.
भावाचं लग्न सोडून त्या ऑपरेशन गंगासाठी रवाना झाल्या. बुडापेस्टहून त्यांनी २५० भारतीय विद्यार्थ्यांना रेस्क्यू केलं. त्याबद्दल त्या सांगतात, ‘खरं तर ते माझं कामच आहे. त्यासाठीच आमचं ट्रेनिंग झालेलं असतं. पुन्हा पुन्हा होतं. आपत्कालीन परिस्थितीत कसं काम करायचं हे आमच्या कामाचाच भाग आहे. ना मी एकटी होते ना एकटीने काही केलं. सगळ्यांचीच साथ मोठी होती. मात्र जेव्हा केव्हा असं स्वत:ला आव्हान देण्याची वेळ येते तेव्हा हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा की, हम नहीं करेंगे तो कौन करेगा? भीती तर सगळ्यांना वाटते, मलाही वाटते. मात्र घाबरण्याचा आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक क्षण असतो.हिंमत एकवटीली आणि सांगितलं स्वत:ला की आपल्यासमोर जे आव्हान आहे ते स्वीकारा तरी, करुन तर पहा. आपण आपल्याभोवती मर्यादांची रिंगणं घातली नाही, आपणच आपल्याला अडवलं नाही तर बाकी कुणाची काय टाप आपला रस्ता अडवून धरेल?’
ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांनीही याप्रसंगी याच धाडसाची आणि स्वत:च्या हिमतीवर भरवसा ठेवण्याची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, अमूक एक गोष्ट मुली करुच शकत नाही असं कुणी सांगितलं तर ते खरं मानून का चालायचं. आपल्यावर विश्वास ठेवून आपण चालत राहिलो, करुन पाहिलं तर आपल्याला आपल्या वाटेचं आकाश नक्की शोधता येतं.
उषा काकडे यांनी याप्रसंगी लहान मुलांवर होणारे अत्याचार, पालकांनी मुलांवर विश्वास ठेवून त्यांना द्यायची साथ आणि मुलामुलींना समजून घेण्याची गरज सांगितली. गुड टच-बॅड टच, लैंगिक छळ यासंदर्भात त्यांनी उभारलेलं काम याचीचही त्यांनी माहिती दिली.
शिवानी कालरा आणि उषा काकडे दोघींनीही आपल्या अनुभवातून सांगितलं की, आपल्याला कुणीच बांधून घालू शकत नाही. आपण फक्त आपल्या मनानं हिंमत धरुन आपण निवडलेलं काम उत्तम आणि हिमतीने केलं पाहिजे.!