Lokmat Women Summit 2022;  कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाशभरारी कशी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 20:23 IST2022-05-14T20:22:35+5:302022-05-14T20:23:01+5:30

Nagpur News आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, असा विश्वास लोकमत वुमेन समिटच्या २०२२ च्या व्यासपीठावर पंछी बनू या विषयावर आयोजित चर्चासत्रातील मान्यवर महिलांनी एकसुरात व्यक्त केला.

Lokmat Women Summit 2022; If you don't leave the comfort zone, how will you take the sky? | Lokmat Women Summit 2022;  कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाशभरारी कशी घेणार?

Lokmat Women Summit 2022;  कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाशभरारी कशी घेणार?

ठळक मुद्दे लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर

नागपूर : कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाश भरारी कशी घेणार, असा प्रश्न उपस्थित करीत महिलांनी आधी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवं. नवी आव्हानं स्वीकारताना स्वत:वर भरवसा ठेवायला हवा. आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, असा विश्वास लोकमत वुमेन समिटच्या २०२२ च्या व्यासपीठावर पंछी बनू या विषयावर आयोजित चर्चासत्रातील मान्यवर महिलांनी एकसुरात व्यक्त केला.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर आणि एलोपेशिया आजारासंदर्भात जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्या केतकी जानी या चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या.

चर्चासत्राचे समन्वयन श्वेता शेलगावकर यांनी केले. स्वतंत्र थिएटरतर्फे रेणुका गटलेवार व त्यांच्या चमूने पंछी बनू- आम का अचार यावर नाट्यछटा सादर केल्या.

- पुरुषांसोबत स्पर्धा नको, महिला सक्षमच - ईशा कोप्पीकर

अभिनेत्री ईशा कोप्पीकर म्हणाली, मुळात आपण हे मान्यच करून टाकू की हे जग पुरुष प्रधान आहे. मग क्षेत्र कोणतेही असो, फक्त सिनेइंडस्ट्रीच कशाला, सर्वच क्षेत्र. त्यामुळे पुरुषांशी सतत महिलांची तुलना आणि स्पर्धा आता आपण बंद करून टाकली पाहिजे. मुळात स्वत:ला हे सांगितलं पाहिजे की आपण जन्मत: सबल-स्वतंत्र आहोत. आपल्याला कोण काय सबलीकरणाचे धडे देणार? आपण आपली ताकद आणि आपलं स्वातंत्र्य ओळखलं पाहिजे. तशी अपेक्षा ठेवली पाहिजे.

 

- केवळ डोक्यावरचे केसं म्हणजे सौंदर्य नाही - केतकी जानी

अपेक्षा म्हणजे नेमकं काय याचं तंतोतंत उदाहरण एलोपेशिया आजारासंदर्भात काम करणाऱ्या केतकी जानी. एका घटनेत डोक्यावरचे सगळे केस गेले. तोंड लपवून डिप्रेशनमध्ये पाच वर्षे घरात घातल्यावर आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत त्या जाऊन आल्या. पण मग आपल्या मुलांचे चेहरे आठवत त्यांनी जगायचं ठरवलं. त्या सांगतात, एलोपेशिया या आजारापायी किती महिला-मुली आत्महत्या करतात. घरात कोंडून घेतात स्वत:ला. परंतु आता मला वाटतं, आपण काय लोकांना सुंदर दिसण्यासाठी, त्यांना एन्टरटेन करण्यासाठी आहोत का? मला लोक टकली म्हणायचे. तू काय पाप केलंस म्हणतात, हे सारं ऐकून घेऊनही जगायचं आनंदानं. ’ सांगता सांगता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तसं सारे भावूक झालं. मात्र जगण्याची त्यांची उमेद सगळ्यांना अतिशय सुखावून गेली. आज त्या एलोपेशिया आजारसंदर्भात जनजागृतीचे काम करतात. त्यांच्या कामामुळे त्यांच्यासारख्या अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळत आहे.

- सुपरवुमन बनण्याचा अट्टाहास सोडा, आनंदाला मुरड घालू नका - मनिषा म्हैसकर

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल महिलांना काम करताना स्वत:ला वारंवार सिध्द करावं लागतं. पुुरुषांपेक्षा दुप्पट काम करावं लागतं. आव्हाने येतातच, पुरुषांनाही येतात. मात्र या साऱ्यातून भरारी घ्यायची तर कुटुंबाची साथ हवी. पालकांचे प्रोत्साहन हवे. अवतीभवती तसं वातावरण हवं, महिला महिलांचं बॉण्डिंग हवं आणि मुख्य म्हणजे सिस्टरहूड तयार व्हायला हवं. त्यातून पोषक वातावरण घडत जाईल. महिलांनीही सुपरवुमन बनायचा अट्टाहास सोडून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मनापासून जगावं. परंतु आनंदाला मुरड घालून स्वस्त बसू नये,’असे आवाहनही त्यांनी केले.

 

- महिलांनी नवीन आव्हानं स्वीकारावी - डॉ. अपूर्वा पालकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘महिला उद्योजक म्हणजे लोणची पापड मसाले एवढेच उद्योग अशी धारणा झाली आहे. असं कशाला? मोठे उद्योग असावे, प्रयोग करावे, मोठी गुंतवणूक असावी अशी स्वप्न पहावी त्यादिशेनं प्रयत्न करायला हवेत. आजही यशस्वी महिलेलाही विचारले जाते, तुझा नवरा काय करतो? कशासाठी? आजही उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण कमी आहे. हे का? या साऱ्यातून वाट शोधायची तर महिलांनी आपला कम्फर्ट सोडून नवीन आव्हानं स्वीकारून ती पेलली पाहिजे.’, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Lokmat Women Summit 2022; If you don't leave the comfort zone, how will you take the sky?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.