Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:30 AM2022-05-13T10:30:12+5:302022-05-13T21:34:03+5:30

Lokmat Women Sumit 2022: राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेत महिला विचारांचा जागर होणार आहे.

'Lokmat Women Summit': A vision of women's empowerment | Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन

Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर येथे उद्या आयोजन : मान्यवरांची मांदियाळी

नागपूर : कर्तृत्वाच्या बळावर पायऱ्या चढत आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या कर्तृत्वशालिनींशी 'लोकमत वूमेन समीट'मध्ये संवाद साधला जाणार आहे. 'लोकमत'तर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., नागपूर यांच्या सहकार्याने लोकमत वूमेन समीटचे नववे पर्व शनिवारी (दि. १४) नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. 'उड़ने की आशा ही यंदाच्या समीटची थीम आहे. राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेत महिला विचारांचा जागर होणार आहे.

मान्यवरांची मांदियाळी

यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या आक्रमक आणि निष्ठावान नेत्या असलेल्या यशोमती ठाकूर महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत. २००९ पासून सलग तीन वेळा त्या तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी महिला सुरक्षेचं ऑडिट हाती घेतले आहे. कुपोषण, बालहक्क या विषयावरही त्या काम करत आहेत. महिलांना तक्रार करण्यासाठी मुंबईत यावे लागत होते. यासाठी त्यांनी महिला आयोगाची कार्यालये राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला. बचतगटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग, अर्थसाक्षरता असे विविध कार्यक्रम त्या राबवित आहेत.

उषा काकडे

यशस्वी उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या उषा काकडे ग्रॅव्हिटिए फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. संस्था महाराष्ट्र राज्यातील वंचित मुले आणि महिलांसाठी काम करते. राज्यातील शाळांमध्ये त्यांनी गुड टच, बॅड टच ही मोहीम राबविली. यातून मुलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनेक समस्या उघड झाल्या. रोटरी इंटरनॅशनल संस्थेतर्फे पॉल हॅरिस फेलो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१९ मध्ये त्यांना राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्राइड ऑफ द नेशन' सन्मानानेदेखील गौरविण्यात आले. समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा ऊर्जा पुरस्कार देऊन त्या गौरव करतात.

रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबिवला. महिलांच्या तक्रारीनंतर त्यांना न्याय देण्यासाठी आयोग तत्काळ पावले उचलत आहे. थेट पीडित महिलांच्या गावात-जिल्ह्यात जाऊन स्वत: आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडणार आहेत. विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सुनावणी तक्रारीसाठी मुंबई कार्यालयात येणे शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे.

ईशा कोप्पीकर

प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ईशा कोप्पीकर यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून लाईफ सायन्सेसमध्य पदवी घेतली आहे. १९९८ पासून दाक्षिणात्य आणि हिदीतील विविध ईशा कोप्पीकर चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ईशा कोप्पीकर सध्या राजकारणातही सक्रिय आहेत. व्हिएतनाममध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे.

डॉ. आरती सिंग

तडफदार पोलीस अधिकारी असलेल्या डॉ. आरती सिंग या २००६ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. चांगल्या सेवेबद्दल केंद्र शासनाकडून त्यांना आंतरिक सुरक्षा पदक, राज्य शासनाकडून विशेष सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने २०२१ या वर्षात गुन्हे प्रकटीकरण अर्थात क्राईम डिटेक्शनमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून एमडी करीत असताना थेट जनतेशी संपर्क आला. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांची जाणीव झाली. महिलांवरील हिंसाचार रोखायचा असेल तर थेट कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारे व्हायला हवे या ध्येयातून त्यांनी भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला.

डॉ. अपूर्वा पालकर

स्टार्ट-अप तज्ज्ञ असलेल्या डॉ. अपूर्वा पालकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटरच्या संचालक आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'अटल' या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारीत (अटल रैंकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट) विद्यापीठाला देशपातळीवर स्थान मिळवून देण्यात त्याचा मोलाचा सहभाग आहे. विविध सरकारांसोबत आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व करीत धोरणात्मक आराखडा आणि संशोधनाच्या विकासामध्ये त्या सक्रिय आहेत. १० वर्षे त्यांनी बिझनेस स्कूलचे नेतृत्व केले. कॉर्पोरेट क्षेत्रातही काम केले. त्यांना रवी जे मथाई फेलो हा बिझनेस एज्युकेशनमधील सर्वोच्च सन्मान, हायर एज्युकेशन फोरमकडून विझनेस एज्युकेटर अवॉर्ड मिळाला आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये त्यांनी पाचहून जास्त पुस्तके लिहिली आहेत.

रसिका दुग्गल

टीव्ही मालिका, सिनेमा आणि वेब सिरीजमधून रसिका दुग्गल यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर या वेब सीरिजमधून त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. गणित विषय घेऊन पदवीधर झालेल्या रसिका यांनी सोशल कम्युनिकेशन मीडियामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पुण्यातील एफटीआयआय येथून अभिनयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केला.

संजना संघी

संजना संघीने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. नवी दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून तिने जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादित केली होती. संजना एक प्रोफेशनल कथ्थक नृत्यांगना देखील आहे. शैक्षणिक कामगिरीसाठी तिला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून अॅप्रिसिएशन लेटर, दिल्ली विद्यापीठाचे गोल्ड मेडलही मिळाले आहे. दिल बेचारा या चित्रपटात संजनाने दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत प्रमुख भूमिकेत काम केले होते.

Web Title: 'Lokmat Women Summit': A vision of women's empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.