लोकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 08:00 AM2018-12-15T08:00:00+5:302018-12-15T08:00:04+5:30

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत.

Lokmat's first editor, P.V. Gadgil and M. Y. Dalvi Smruti Lokmat Journalism Award | लोकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

पां. वा. गाडगीळ व म.य. उपाख्य बाबा दळवी

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ वर्षांपासून सुरू आहे पत्रकारिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात विखुरलेल्या मराठी पत्रकारांचा गौरव करण्याचा घेतलेला वसा लोकमतने निष्ठेने पाळला आहे. नागपूरमध्ये या पुरस्कारांचे आज संध्याकाळी वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक कुमार केतकर व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांच्या निमित्ताने ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो आहे, त्या पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी या दोन ज्येष्ठ संपादकांचा अल्प परिचय देत आहोत.

लोकमतचे प्रथम संपादक पां.वा. गाडगीळ

एक व्यासंगी संपादक म्हणून पां.वा. गाडगीळ यांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग वासुदेव गाडगीळ. पण ते पां.वा. गाडगीळ म्हणूनच ख्यातनाम होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे ३ एप्रिल १८९९ मध्ये झाला. लोकमान्य टिळकांवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता. १९२० केसरीमध्ये मुद्रण शोधकाच्या कामापासून गाडगीळांनी सुरुवात केली. तात्यासाहेब केळकर यांच्या सानिध्यात त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरविले. पुढील काळात ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संपादक आणि विचारवंत म्हणून परिचित झाले. लोकमान्य, लोकमित्र, नवशक्ती या दैनिकांचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत गाजली. नागपूरला १५ डिसेंबर १९७१ मध्ये लोकमत सुरू झाल्यानंतर लोकमतच्या संपादकीयपदाची धुरा गाडगीळ यांनी आपल्या शिरावर घेतली. लोकमतचे संपादक म्हणून त्यांनी विदर्भाच्या वृत्तपत्रसृष्टीत जे कार्य केले ते केवळ बेजोड म्हणावे लागेल. ते मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक होते. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे १८ एप्रिल १९८७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

लोकमतचे द्वितीय संपादक म. य. दळवी उपाख्य बाबा दळवी
पां.वा. गाडगीळ यांच्यानंतर लोकमतची धुरा यशस्वीपणे वाहून नेण्याचे मोलाचे कार्य पार पाडलेले मधुकर यशवंत दळवी उपाख्य बाबा हे लोकमतचे द्वितीय संपादक होते. नागपुरात लोकमतचे काम सात वर्षे सांभाळल्यानंतर औरंगाबाद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीची जडणघडण करण्यात बाबा दळवींचा सिंहाचा वाटा होता. कार्यकारी संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मानद संपादक म्हणून अखेरपर्यंत काम केले.
महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीत वाढलेले बाबा दळवी हे आदर्श पत्रकारितेचा नमुना होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वृत्तीने ते आयुष्यभर वागले. आताच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या जंजिरा मुरूड या संस्थानात त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या नवशक्ती व लोकसत्तामध्ये अनेक वर्ष उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर काम केल्यानंतर १९७५ साली नागपुरातील लोकमतच्या दैनिकाचे कार्यकारी संपादक म्हणून बाबा दळवी यांनी सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्रात त्यांच्या शिबिरातून तयार झालेले अनेक पत्रकार आजही आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी २७ मार्च १९९६ मध्ये त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.
या दोन थोर संपादकांच्या स्मृतीत लोकमतने पां.वा. गाडगीळ सामाजिक लेखन व म.य. दळवी शोधपत्रकारिता हे दोन पुरस्कार सुरू केले आहेत.
 

Web Title: Lokmat's first editor, P.V. Gadgil and M. Y. Dalvi Smruti Lokmat Journalism Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.