लोकमतचा दणका : नागपूरच्या सेंट्रल बाजार रोडने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:14 PM2018-11-16T23:14:29+5:302018-11-16T23:18:55+5:30
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला.
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवर इस्पितळ, खासगी आस्थापने, शाळा, रेस्टॉरंट आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. या रस्त्यावरून चालणे म्हणजे एक परीक्षाच असते. फूटपाथ शोधूनही सापडणार नाही, अशी अवस्था असते. पार्किगमुळे नेहमीच ट्रॅफिक जॅम असते. रेस्टॉरंट चालकांनी तर फूटपाथवरच दुकान थाटले आहे. एकूणच या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना सोसावा लागतो. लोकमतने यावर शुक्रवारच्या अंकात ’सेंट्रल बाजार’ मार्ग झाला कोंडीचे केंद्र’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित होताच खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण विरोधी पथक जेसीबीसह सेंट्रल बाजार रोडवर पोहोचले. जेसीबीच्या मदतीने या रस्त्यावरील विविध प्रतिष्ठानांचे अतिक्रमण, बोर्ड हटविण्यात आले. विशेष म्हणजे अनेक प्रतिष्ठान, दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्याच्या काठावर अतिक्रमण करून शेड उभारले होते. ते पाडण्यात आले. काही ठिकाणी शक्य होते ते काढण्यात आले.
पक्के बांधकामही तोडले
काचीपुरा चौक ते लोकमत चौकापर्यंत अनेक रुग्णालये आहे. येथे अॅम्ब्युलन्ससह इतर वाहनांनी रुग्ण नियमित येत असतात. यातच दुकानदरांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईदरम्यान काही पक्के अतिक्रमण बांधकामही पाडण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमण करणारे हादरले आहेत.