लोकमतचा दणका : मेडिकलच्या ‘त्या’ प्रसूतीप्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:52 PM2019-06-03T22:52:09+5:302019-06-03T22:53:10+5:30
मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन दिवसात याप्रकरणी या समितीने अहवाल सादर करायचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन दिवसात याप्रकरणी या समितीने अहवाल सादर करायचा आहे.
नागपूरच्या मेडिकल कॉलेज येथे ही घटना घडली. ही गंभीर घटना लोकमतने उघडकीस आणली. या घटनेमुळे संपूर्ण नागपूररांचे मन हेलावून निघाले. या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. सोमवारी मुंबईत पालकमंत्री बावनकुळे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची माहिती दिली. आ.सुधाकर कोहळे व आ. परिणय फुके हे त्यांच्यासोबत होते. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजात मेडिकलच्या डॉक्टर आणि नर्सेसबदल संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाच या घटनेची दखल घेणे आवश्यक झाले होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली. पालकमंत्री बावनकुळे यांच्या मागणीमुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सर ज.जी.समूह रुग्णालयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अशोक आनंद, वैद्यकीय शिक्षणचे अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल या चार सदस्यांची समिती गठित केली असून या समितीला आपला चौकशी अहवाल तीन दिवसात द्यायचा आहे.
हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी : बसपाने अधिष्ठात्यांना दिले निवेदन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग व प्रसूती विभागात एका महिलेला स्वत:च्या हातानेच प्रसूती करण्याची वेळ आल्याच्या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) दक्षिण-पश्चिमच्यावतीने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना देण्यात आले.
‘लोकमत’ने ‘तिला स्वत:च्या हातानेच करावी लागली प्रसूती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रसूती विभागातील भोंगळ कारभार पुढे आणला. याची दखल पालकमंत्र्यांपासून ते वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली. बसपाचे दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे संयोजक चंद्रशेखर कांबळे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ सोमवारी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांना भेटले. गरीब रुग्णांच्या जिवाशी चालणारा खेळ बंद करण्याची व सुकेशनी चतारे या महिलेच्या प्रसूतीच्यावेळी ज्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. शिष्टमंडळात रोहित पानतावने, स्वप्निल कांबळे, बलवीर नंदागवळी, आशा गायकवाड, किरण घडे, वैशाली कांबळे, अभिजीत नंदागवळी, बालचंद जगताप, अनिल चहांदे, सुनील पाटिल, सीमा चरपे, प्रबोधन मेश्राम, लक्ष्मी जगताप आदींचा सहभाग होता.