‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्कार जाहीर; शाल्मली सुखटणकर, मेहताब अली नियाझी विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:49 AM2022-03-11T08:49:38+5:302022-03-11T08:52:30+5:30
नागपुरात २३ मार्च रोजी ९वा सन्मान सोहळा. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभावंतांच्या सन्मान सोहळ्याचे हे नववे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभावंतांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून, मागील आठ वर्षात या मंचने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमधुर आवाज आणि संगीत कौशल्याने अल्पावधीतच रसिकांच्या मनाला भुरळ घालत अधिराज्य गाजवणारी नवोदित गायिका शाल्मली सुखटणकर व प्रसिद्ध गझल गायक मेहताब अली नियाझी हे ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२२’चे विजेते ठरले आहेत. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२२चे वितरण बुधवारी (दि. २३) नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभावंतांच्या सन्मान सोहळ्याचे हे नववे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभावंतांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून, मागील आठ वर्षात या मंचने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ हा असा मंच आहे, ज्या माध्यमातून अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबतच संगीताचे क्षेत्र विस्तारण्यात योगदान ठरलेले आहे. मागच्या आठ वर्षात या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. यंदाच्या या नवव्या पर्वात आघाडीच्या शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ व गत पर्वातील पुरस्कार विजेता लिडियन नादस्वरम हे विशेष आकर्षण राहणार आहे. एकूणच देशभरातील युवा पीढीमध्ये संगीतविषयक आस्था वाढवण्यामध्ये ‘सूर ज्योत्स्ना’चे मोलाचे योगदान राहिले आहे.
शाल्मली सुखटणकर
शाल्मली सुखटणकर ही मराठी गायिका असून, चांदोबा या गाण्याने ती चर्चेत आली. तिने डॉ. वैजयंती जोशी यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. २००९मध्ये झी मराठीवरील रिॲलिटी शो सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये पहिल्या फेरीत तिची निवड झाली आणि पहिल्या सहा स्पर्धकांपैकी एक होती. या शोमुळे गायनाबद्दल तिच्या जाणिवा समृध्द झाल्या आणि पूर्णवेळ या क्षेत्रात ती ओढली गेली. शालेय शिक्षणानंतर ती मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये कला शाखेत गेली. तिने वर्षा भावे यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. त्यांनीच तिला सा रे ग म प मध्ये प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर तिला लवकरच ‘हसले मनी चांदणे’ या मराठी चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून पहिला ब्रेक मिळाला.
कौशिकी चक्रवर्तीची फ्यूजन कॉन्सर्ट
शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या कौशिकी चक्रवर्ती यांच्या फ्यूजन कॉन्सर्टचा आस्वाद रसिकांना यावेळी घेता येणार आहे. कौशिकी चक्रवर्ती या भारतीय शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. कौशिकी यांनी शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई चंदना चक्रवर्ती आणि वडील अजय चक्रवर्ती यांच्याकडून घेतले. वयाच्या १६व्या वर्षी दिल्लीच्या इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये त्यांचा पहिला मोठा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांच्यासोबत एस. आकाश, दर्शन जोशी, मुराद अली, अतुल रनिंगा, शेल्डोन डिसिल्वा व ओजस अडिया असतील.
मेहताब अली नियाझी
मेहताब अली नियाझी यांचा जन्म २० ऑक्टोबर १९९७चा आहे. मेहताब हे भिंडीबाजार घराण्याचे सतार वादक आहेत. ते प्रसिद्ध सतारवादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे पुत्र असून, त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून मेहताब यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मेहताब परफॉर्म करत आहेत. पं. बिरजू महाराज यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मेहताब यांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिले सादरीकरण केले. त्यांच्या अतुलनीय सादरीकरणामुळे प्रेक्षकही थक्क झाले होते. आज त्यांची ओळख अविश्वसनीय नवोदित सतारवादक म्हणून असून त्यांची देशभरात ख्याती आहे. विविध शहरात त्यांचे सादरीकरण झाले असून, त्यांच्यातील प्रतिभेला प्रशंसा प्राप्त होत आहे. मेहताब यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
लिडियन नादस्वरमचे परफॉर्मन्स
लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार आठव्या पर्वातील पुरस्कार विजेता लिडियन नादस्वरम याचा परफाॅर्मन्स अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. लिडियनचा जन्म वर्षन सतीश व झाशी या दाम्पत्यांच्या पोटी ६ सप्टेंबर २००५ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. दोन वर्षांचा असताना त्याने ड्रम वाजविण्यास सुरुवात केली आणि आठ वर्षांचा असताना त्याने पियानोवादक म्हणून शिकण्यास सुरुवात केली. तो सेंच्युरी ओल्ड मद्रास म्युझिकल असोसिएशनचे संगीत दिग्दर्शक ऑगस्टिन पॉल यांचा विद्यार्थी आहे. त्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
बनवारीलाल पुरोहित, राज्यपाल, पंजाब, देवेंद्र फडणवीस विधानसभेतील विरोधी पक्षनेते, प्रफुल्ल पटेल माजी केंद्रीय मंत्री हे उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड
प्रसिध्द संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, पद्मभूषण पं. विश्वमोहन भट, पद्मभूषण उस्ताद राशीद खान, पं. शशी व्यास, प्रसिध्द पार्श्वगायक रूपकुमार राठोड, टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी या पर्वातील पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.