११ तास कामाच्या आदेशाला लोकोपायलटचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:38 PM2018-12-08T22:38:11+5:302018-12-08T22:39:03+5:30
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या ११ तास काम करण्याच्या आदेशाला नागपूर विभागातील लोकोपायलटने तीव्र विरोध दर्शविला आहे. या आदेशाविरुद्ध नागपूर विभागातील लोकोपायलटने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या रनिंग शाखेच्या नेतृत्वात लोकोपायलट व गार्ड लॉबीसमोर धरणे आंदोलन करून द्वारसभा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या ११ तास काम करण्याच्या आदेशाला नागपूर विभागातील लोकोपायलटने तीव्र विरोध दर्शविला आहे. या आदेशाविरुद्ध नागपूर विभागातील लोकोपायलटने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या रनिंग शाखेच्या नेतृत्वात लोकोपायलट व गार्ड लॉबीसमोर धरणे आंदोलन करून द्वारसभा घेतली.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने नुकताच एक आदेश काढून त्यात रेल्वे बोर्डाच्या नियमाविरुद्ध लोकोपायलट, सहायक लोकोपायलट आणि गार्डला ११ तास ड्युटी करण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रेल्वे बोर्डानुसार या पदांसाठी केवळ ९ तास ड्युटी करण्याचे बंधन आहे. त्याच प्रमाणे रनिंग स्टाफला मुख्यालयात १६ तास विश्रामाची वेळ ठरवून देण्यात आली आहे. परंतु रेल्वे प्रशासनातर्फे रनिंग स्टाफला १४ तासानंतर कामावर बोलविण्यात येत आहे. हा रेल्वे सुरक्षेशी खेळ आहे. यामुळे रनिंग स्टाफला विश्रांती घेण्यास वेळ मिळत नसून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात येत असल्याचा आरोप लोकोपायलटने केला. द्वारसभेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, विभागीय सचिव बंडु रंधई, विभागीय संघटक ई. व्ही. राव, मुख्यालय सदस्य वाय. डब्ल्यू. गोपाल यांच्यासह रनिंग शाखेचे पदाधिकारी जे. बी. नायर, भारत ताकसांडे, ओ. पी. शर्मा, पीयूष मिश्रा, मनोहर अगुटले यांनी मार्गदर्शन केले. संचालन मिलिंद पाठक यांनी केले. यावेळी रेल्वे कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकोपायलटची २५० पदे रिक्त
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला सर्वाधिक माल वाहतुक करण्यासाठी अवॉर्ड देण्यात आला आहे. हा अवॉर्ड रनिंग स्टाफमुळे मिळाला आहे. परंतु विभागात लोकोपायलटची २५० पेक्षा अधिक आणि गार्डची ७६ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत लोकोपायलट, गार्डला वेळेवर सुट्या, विश्रांती देण्यात येत नाही. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.