लोमेश्वरमामालाही हवी 'जादू की झप्पी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 09:47 AM2020-05-14T09:47:37+5:302020-05-14T09:48:21+5:30
मेयोच्या कोरोना वॉर्डात सेवा देणारे ‘लोमेश्वर मामा’ म्हणजे मकसूद भाईचे एक रूप. प्रामाणिकपणे सेवा देतानाच आपल्या हसमुख स्वभावाने बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मामा करीत आहेत.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मुन्नाभाई एमएमबीबीएस’मधला मकसूद भाई आठवतो का? हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारा तो व्यक्ती ज्याला मुन्नाभाई पहिल्यांदा ‘जादू की झप्पी’ देतो. कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठ श्रेणीच्या अधिकारी वर्गाच्या कामाची प्रशंसा होताना अशा मकसूद भाईसारख्यांचे योगदान दुर्लक्षित राहते. मेयोच्या कोरोना वॉर्डात सेवा देणारे ‘लोमेश्वर मामा’ म्हणजे मकसूद भाईचे एक रूप. प्रामाणिकपणे सेवा देतानाच आपल्या हसमुख स्वभावाने बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मामा करीत आहेत.
मेयो रुग्णालयात कक्ष सेवक (वॉर्ड अटेंडन्स) म्हणून सेवारत असलेले लोमेश्वर लक्षणे हे लोमेश्वर मामा म्हणून प्रसिद्ध. कोरोना वॉर्डात नियुक्ती झाली तेव्हा भीती व तक्रारीचा लवलेशही न ठेवता ते सेवेत रुजू झाले. डॉक्टर, नर्सेसच्या मदतीसाठी हा माणूस जेवढा तत्पर तेवढाच बाधित रुग्णांचे बेड लावणे, जेवण पुरविणे, औषधी देण्याचे काम करताना त्यांच्यातील सेवेचे हास्य कधी थांबत नाही. उलट स्वभावानुसार रुग्णांचे मनोरंजन करीत त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे समाधानाचे कार्य त्यांच्याकडून घडत आहे. म्हणूनच या वॉर्डात हा ‘मामू’ सर्वांचा प्रिय आहे.
२६ कर्मचारी दोन महिन्यांपासून सेवेत
मेयोच्या वॉर्ड क्रमांक ४, ५, ६, ७ व २४ मिळून कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला असून त्यात २६ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून तीन शिफ्टमध्ये काम चालत असल्याचे स्वछता निरीक्षक मृणाल मेंढे यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्यात भीतीची भावना होती पण अंगावर सुरक्षा किट चढविणे किंवा काढणे आदींचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते तयार झाले. गेल्या दोन महिन्यांपासून हे कर्मचारी सेवा देत असताना कोणतीही तक्रार आली नाही किंवा आरोग्याची समस्याही निर्माण झाली नाही. आता रुग्णसंख्या वाढत असली तरी हे सर्व मानसिकरीत्या भक्कम असल्याची ग्वाही मेंढे यांनी दिली.