लंडनच्या फेसबुक फ्रेण्डने गंडविले
By Admin | Published: July 30, 2016 02:21 AM2016-07-30T02:21:06+5:302016-07-30T02:21:06+5:30
फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली ७५ हजारांचा गंडा घातला.
महागड्या भेटवस्तूचे आमिष : ७५ हजार हडपले
नागपूर : फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली ७५ हजारांचा गंडा घातला. त्याची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर लिली सुनील यादव (वय ५६, रा. गणेशपेठ) या महिलेने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
डॉ. चार्ली डे ड्रीक आणि रेली अँगल (रा. लंडन युनायटेड किंगडम) अशी आरोपींची नावे आहेत. लिली यादव यांची डॉ. चार्ली सोबत महिनाभरापूर्वी फेसबुकवर ओळख झाली. फेसबूक फ्रेण्ड बनल्यानंतर ते नंतर एकमेकांच्या आॅनलाईन संपर्कात आले. लिली यादव यांची आणि परिवाराची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आरोपीने यादव यांना मैत्रीखातर काही भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. सोन्याचे दागिने आणि महागडा आयफोन अशा या कथित भेटवस्तू राहील, असेही सांगितले. काही दिवसानंतर यादव यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला.
त्यात दिल्ली युनियन बँकेच्या ३४९९०२०१००४५९३५ या खात्यात ७५ हजार रुपये जमा करा आणि आपले पार्सल घेऊन जा, असा फोन आला. त्यामुळे यादव यांनी नमूद खात्यात ७५ हजार रुपये जमा केले. पुन्हा काही वेळेनंतर त्यांना तसाच फोन आला. ७५ हजार रुपये पुन्हा जमा करा आणि पार्सल घेऊन जा, असे आरोपीने सांगितले.
त्यामुळे यादव यांनी काही हितचिंतकांशी चर्चा केली. चर्चेनंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी लकडगंज ठाण्यात धाव घेतली. २८ जून ते २८ जुलै दरम्यानचे आॅनलाईन संभाषण, मेसेज आणि अन्य पुरावे दाखविल्यानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी डॉ. चार्ली डे ड्रीक आणि रेली अँगल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)