लांबचा प्रवास हा जळितांच्या मृत्यूला कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:15 AM2020-02-10T10:15:01+5:302020-02-10T10:16:15+5:30
जळीत रुग्णांना लांब अंतर कापून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजही जिल्हास्तरावर जळीत रुग्णांसाठी विशेष सोय नाही. अशा रुग्णांना लांब अंतर कापून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्लास्टिक सर्जरी विभागाने केलेल्या अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत केलेल्या अभ्यासात मेडिकलमध्ये १००पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून आलेल्या १७० रुग्णांचा, ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ४८ रुग्णांचा तर १० ते ५० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
आगीच्या सर्वाधिक घटना उन्हाळ्यात दिसून येत असल्या तरी वाढते शहर व औद्योगिकीकरणामुळे अशा घटनेत वाढ झाली आहे. जळाल्यामुळे जखमांची खूप आग होते, हवेची हलकी झुळूकही या जखमांवरून गेली की वेदनेचा स्फोट होतो.
शिवाय, जंतूसंसर्गाचा धोका असतो. यामुळे जखमी रुग्णांना विशेष उपचाराची व देखभालीची गरज असते. परंतु मध्यभारतातील शासकीय रुग्णालयांमध्ये तशी सोय नाही. अनेक रुग्णांना १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून उपचारासाठी नागपूरचे मेडिकल गाठावे लागते. हे अंतरच रुग्णांसाठी घातक ठरत आहे. यावर प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या अभ्यासात हे चित्र आणखी स्पष्ट झाले आहे.
३० ते ६० वयोगटात ११९ मृत्यू
अभ्यासात असेही दिसून आले की, जळालेले ६ ते १२ वर्षे वयोगटातील १५३ रुग्ण बरे झाले, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. १२ ते ३० वयोगटातील १९९ रुग्ण बरे होऊन १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. ३० ते ६० वयोगटातील २०५ रुग्ण बरे होऊन ११९ रुग्णांचा मृत्यू तर ६० वयोगटावरील ४४ रुग्ण बरे होऊन ६९ रुग्णांचा मृत्यू झाला.
लांब अंतरामुळे उपचारात उशीर
जळाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा रूग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखखाली मोठ्या प्रमाणात सलाईन द्यावे लागते. परंतु गेल्या तीन वर्षांत लांब अंतरावरून रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असता, बहुसंख्य रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे, प्रवासामुळे उपचारात होत असलेला उशीर, हे दोन्ही कारण मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले.
-डॉ. सुरेंद्र पाटील,
विभाग प्रमुख,
प्लास्टिक सर्जरी विभाग