धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 09:43 PM2020-10-14T21:43:31+5:302020-10-14T21:46:06+5:30

Dhammachakra Pravartan Din, Nagpur news डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला. दरवर्षी लाखो बौद्ध बांधव या क्रांतिसूर्याला नमन करण्यासाठी दीक्षाभूमीकडे धाव घेतात पण यावेळी ते शक्य नाही. मात्र परिस्थितीची जाण ठेवत अनुयायांनी शक्य होईल तसे या महामानवाला कृतज्ञतापूर्ण मानवंदना दिली.

Long live the day of Dhamma Chakra Pravartan Din ... Tribute to Tathagata Buddha, Dr. Babasaheb | धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

googlenewsNext
ठळक मुद्देएसएसडीची परेड, संघटनांचे नियमपूर्ण अभिवादन

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला. बुद्धाचा विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांनी नव्या आयामातून अनुयायांना भेट दिला आणि त्यांचे आयुष्य एका क्षणात सूर्यबिंबाकडे नेले. त्या तेजाने प्रकाशमान झालेली नागपूरची दीक्षाभूमी कोटी कुळांची प्रेरणाभूमी ठरली आहे. दरवर्षी लाखो बौद्ध बांधव क्रांतिसूर्याला नमन करण्यासाठी दीक्षाभूमीकडे धाव घेतात पण यावेळी ते शक्य नाही. मात्र परिस्थितीची जाण ठेवत अनुयायांनी शक्य होईल तसे या महामानवाला कृतज्ञतापूर्ण मानवंदना दिली.

कोरोना संक्रमणाच्या भीतीने जवळपास सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धम्मक्रांतीचा सोहळासुद्धा रद्द झाला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे गेटही बंदच ठेवण्यात आले आहे. भीम अनुयायांनीही परिस्थितीची जाणीव ठेवत धोक्याचे कारण ठरणार नाही या दृष्टीने घरूनच तथागत बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दरम्यान, काही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संघटनांनी नियमांचे पालन करीतच संविधान चौक व दीक्षाभूमीच्या गेटबाहेरून क्रांतिसूर्याला अभिवादन केले. बुधवारी सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने नियमांचे पालन करीत दीक्षाभूमीबाहेरच परेड करीत मानवंदना दिली. दलाच्या सैनिकांनी शारीरिक अंतर ठेवत आणि सुरक्षेचे नियम पाळत महामानवाचे अभिवादन केले. दरम्यान, विविध संघटनांनीही मोजक्या उपस्थितीसह संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब यांना कृतज्ञ नमन केले. अनेक वस्त्यांमधील महिला, पुरुषांनी पाच-पाचच्या संख्येत दीक्षाभूमी व संविधान चौकात पोहचून मानवंदना दिली. तर बहुतेकांनीच घरीच छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करीत धम्मक्रांतीचा जागर केला. शहरातील सर्व बुद्धविहारांमध्येही बुद्धवंदनेसह अभिवादन कार्यक्रम पार पडले. दरम्यान, अनुयायांनी सोशल माध्यमांवर एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब यांच्याप्रति कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.

पोलिसांचा बंदोबस्त, अनुयायांचे नियम पालन

दीक्षाभूमीवर जमा होण्याची बंधने असली तरी काही मोजक्या अनुयायांनी अभिवादनासाठी हजेरी लावली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी समता सैनिक दलाच्या मानवंदना परेड नंतर काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. दीक्षाभूमीची चारही प्रवेशद्वारे बंद होती. त्यामुळे पोहचलेल्या अनुयायांनी लक्ष्मीनगर रोडवरील प्रवेशद्वाराबाहेरूनच क्रांतीभूमीला नमन केले.

व्हीआयपीला सोडण्यावर आक्षेप

दीक्षाभूमीचे प्रवेशद्वार सामान्य नागरिकांसाठी बंद होते. दरम्यान अभिवादन करण्यास आलेल्या एका व्हीआयपीला आत सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे आधीच आत जाण्यास आतुरलेल्या इतर अनुयायांनी त्यावर आक्षेप घेत विरोध सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी नमते घेतले.

संविधान चौकातही दिली मानवंदना

दीक्षाभूमीप्रमाणे संविधान चौक येथेही अनुयायांनी हजेरी लावली. मात्र ही संख्या अत्यल्प होती. विविध संघटनांनी मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनुयायांचे येणे-जाणे सुरू होते.

Web Title: Long live the day of Dhamma Chakra Pravartan Din ... Tribute to Tathagata Buddha, Dr. Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.